मैत्रीचा वेल

मैत्रीचा वेल
        
          निधीने सगळी बॅग व्यवस्थित. भरली. एक्झामसाठी लागणार सगळ साहित्य, पेपर, पेन्सील, कलर पेन्सिल्स, रबर शार्पनर, क्राफ्टबुक, सगळं नीटनेटकं दप्तरात भरलं. आईने टिफीन बॅग तयारच ठेवली होती. १० मिनिटात स्कूलबस येईलच.  सॉक्स, शूज घालून निधी स्कुलबसची वाट पहात थांबली.
पों पों हॉर्न वाजवत बस आली. हॉर्नचा आवाज ऐकून निधीची आई बाहेर आली, निधीने जाता जाता आईला बाय बाय केलं आणि पटकन बसमध्ये चढली.
शाळेत गेल्यावर सगळे आपआल्या जागी बसले. आज क्राफ्ट अॅण्ड ड्रॉईंगची एक्झाम होती.
रूबीना मिस वर्गात आल्या, आल्या त्यांनी मुलांना काही सुचना दिल्या आणि क्राफ्ट साठी एक तसेच ड्रॉईंगसाठी एक असे दोन वेगवेगळे विषय दिले.
निधीने आधी ड्रॉईंगच साहित्य वर काढुन ठेवल.
           स्निग्धाही आपल्या बॅग मधुन एकेक साहित्य काढू लागली, ‘अरे बापरे, हे काय, तिने तर कलर पेन्सिली आणल्याच नव्हत्या गडबडीत. आता मिस सगळ्यांसमोर ओरडतील, आपल्याला ड्रॉईंग करता येणार नाही म्हणजे, मार्क्सपण मिळणार नाहीत,’  तिची चांगलीच घाबरगुंडी उडाली, टपोरे डोळे पाण्याने डबडबले, त्यातला एक छोटा थेंब खाली ओघळला, कुणी पाहु नये म्हणुन ती खाली मान घालुन बसली.
          निधीच लक्ष रडवेल्या स्निग्धाकडे गेलं,
“काय ग स्निग्धा अस रडुबाई होऊन का बसलीस, काय झालं?”
“निधी माझे कलर पेन्सिल्स घरीच विसरलेत, आत्ता मिस मला ओरडतील, मला पेपर लिहीता नाही येणार आणि मला मार्क्सपण नाही मिळणार.”
“एवढंच ना मग त्यात काय इतकं रडण्यासारखं, हे बघ माझ्याकडे कलर पेन्सिल्सचा बॉक्स आहे, थोडे तू वापरलेस म्हणून काही लगेच संपून नाही जाणार.”
“थॅंक्स निधी.” स्निग्धाच्या जीवातजीव आला.
पेपर संपल्यावर दोघी वर्गा बाहेर आल्या, स्निग्धान निधीचा हात पकडला आणि तिला घट्टं मिठी मारली. मैत्रीचा वेल मुळं धरू लागला.
© मेघश्री श्रेष्ठी.
रत्नागिरी.

Post a Comment

1 Comments

Vegabond said…
"मैत्रीच्या नात्याचं वेल" सुंदर !!