आमची मस्ती-आमची दोस्ती

आमची मस्ती-आमची दोस्ती.

        इशान, देवम, शाहीन, गौरी, वेदिका सगळे जण एकत्र जमुन खेळत होते. ही त्यांची नेहमीची वेळ, बिल्डिंगच्या खाली पार्किंगसाठी जी जागा आहे, तिथच जमायचे सर्वजण.

आज ते लपाछपी खेळत होते, डाव मस्तच रंगात आला होता. इशानवर राज्य होत, त्याने सगळ्यांना शोधून काढलं, सर्वजण आपआपल्या जागेवरुन पटकन बाहेर पडले.

नेहमी प्रमाणे वेदिका लटक्या रागात म्हणाली, “नाही नाही इशान दादा, तू चिटींग केली, मी नाही राज्य घेणार.” तिच्यावर राज्य आलं की ही तिची नेहमीची तक्रार.

“हे बघ वेदिका तुझी रोजरोजची नाटकी नाही हं खपवून घेणार मुकाट्यानं राज्य घे.” इशाननं एवढच म्हंटल आणि वेदिका फुरगटून बसली, सगळेच जण काही वेळ तोंड फिरवून गपचूप बसले.

दुसर्या मजल्यावर राहणार्या बेडेकर काकींकडे दोन दिवस झाल एक काका आले होते, त्यांचे कुणी नातलग असावेत. त्यांनी कालच मुलांशी भरपूर गप्पा मारल्या होत्या. त्यांनी हाक मारल्यावर वेदिका पळतच गेली. सगळ्यांनी तिच्याकडे पाहुन न पाहिल्यासारख केलं. त्या काकांनी वेदिकाला चॉकलेट पण दिलं आणि तिचा पापा पण घेतला.

“चल तुझ्याशी भांडतात न सगळे, आपण दोघच वर जाऊन खेळुया, काकु नाहियेत घरी.” अस म्हणत त्यांनी तिला जवळ ओढल, तिला घट्ट पकडली, वेदिकाला मात्र त्यांच अस वागणं खटकत होतं. ती त्यांच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करु लागली. “नको काका परत कधी तरी येईन मी तुमच्यासोबत, आत्ता मला जाऊ दे.”

इशानच लक्ष होतं मात्र त्यानं फारस मनावर घेतलं नाही.

वेदिकाच काही एक न ऐकता त्यांनी तिच्या कमरेला धरून उचलूनच घेतलं. “आरे बाळा, चल आपण दोघ खुप मस्ती करू, तूला मी छान छान खाऊ देईन, खुप चॉकलेट देईन.”

तिला उचलुन घेतलेलं पाहताच सगळे तिकडे धावले आणि त्यांनी त्या काकांच्या भोवती एकच गलका केला. “काका आम्हांला पण चॉकलेट हवं, आम्हाला पण हवं.”

पोरांचा आरडाओरडा ऐकुन वॉचमन काका आले.

त्या काकांनी वेदिकाला तिथेच सोडल अन् हो हो करत तिथून काढता पाय घेतला.

गौरीने वेदिकाचा हात घट्ट पकडला. वॉचमन काकांना पोरांनी घडला प्रकार सांगितला.

“असं होय, मी चांगलच लक्ष ठेविन आता त्या पावण्यावर” असं म्हणत काकांनी सर्वांना घरी जायला सांगितल पोरांनी आधी घाबरलेल्या वेदिकाला तिच्या घरी सोडल, मग सगळे आपआपल्या घरी निघून गेले.

    आपण रोज ज्यांच्याशी उगाच वाद घालतो त्या आपल्या मित्रमैत्रिणींमुळेच आपल्या वरच संकट टळलं, हे वेदिकाच्या लक्षात आलं. तिने ठरवलं यापुढे आपल्या मित्रांशी कधीच नाही भांडायचं.

हळुच आईच्या कुशीत शिरत तिने झाला प्रकार आईलाही सांगितला. त्या चिमुरड्यांच्या धाडसाचं आणि समयसुचकतेच आईलाही फारच कौतुक वाटलं. तिचेही डोळे नकळत पाणावले.

© मेघश्री श्रेष्ठी.

रत्नागिरी.

Post a Comment

0 Comments