‘आबाळ’
“कुठलं काय वृत्तीच नालायक बाईची. जातीवंताची आस्ती तर कसं पण दिवस काढलं असतं.”
“नशीब बाई एकेकाच, तिला तर काय लेकरं नको झाली आसतीली? एवढी देखणी पोरं! नवसानं पन हुईनाती एकेकाला आणि या भाड्याचं नशीब बघ की.”
“लेकराकडनी बगुन तर एकादीन दिस काडलं आस्त.”
“तिला आठवण येत नसल व्हय गं! माझी कशी आसतीली?, काय खात आसतीली?, कोण बगत आसल!”
“येवडा ईचार हाय आन् मग आसं करतं व्हय माणुस? चैनी कराय सोकावल्याली, तिला काय पडलय मागच्यांच?”
“तस न्हवं, मला आपलं वाटत गं, कुट आसल तितनं यावं आपली पोरबाळं हायती म्हणुन. त्या तर भाड्यांच नशीब उघडल.”
“आन परत आली तर तसलीला घ्यायची व्हय घरात? कुटं हाय-नाय पत्या नाय, कुणा बरुबर त्वॉंड काळ केलं माहित नाय, तसलीला कोन घिल परत!”
“आणि परत आली तर त्यो काय र्हायचाय का सरळा तिच्या बरबर, मागं तस पुढं व्हायचं.”
“पन कुट गेली आसल ती?”
“ती गेल्ती आधी आईकड. मग तिथं पन शेजारीपाजारी इचाराय लागल्यावर आईन लांब घालवली कुट आन् कामबी मिळवुन दिलं.”
“मग कुट व्हती तितं तर सरळ र्हायाच नाय का!”
“तस आस्तय व्हय कुटं. एकटी बाय म्हणजे इस्तु न्हवका. कोन जगु देतय बाई! खर्याची दुनिया हाय का आत्ता?”
“हम्म”
“ती गेली नसती गं. खरं त्यो भाड्या जीवावरच उटला तिच्या, मग काय करील?”
“काय झाल्त येवडं जीवावर उटायला?”
“ती दुसर्यांदा बाळत झाली तवा एक पावणी आल्ती बगायला. तिन आळ घेतला हिच्यावर माजी माळ चोरली म्हुन, मग काय तेन मरोस्तवर मारली गं बिचारीला.”
“सगळ्या गल्लीनं पळत व्हती बिचारी, कोनकोन गेलं नाय पुढ तेच्या, दुसर्या दिवशी भाव आला आन् घिवुन गेला.”
“त्या माराच्या भ्यानच आली नाय बग ती.”
“हे धाकटं कार्ट तिच्याकड व्हतं तवा लय गॉड व्हतं. लय चांगला सांबाळलेला बग तेला. कसलं देखणं दिसायचं पॉर, आत्ता चारचार दिस अंगाला पाणी बी मिळना तेंच्या.”
“कुटकुट कामं करायची अशीच, मिळल ती, त्यातनच कुटल्या भाहीरच्या माणसाची वळक झाली, तेच्या बरच र्हाय लागली.”
“तितं जावुन तिचा संसार मोडुन त्या बारक्याला आणला तिच्या जवळन, ताटातुट केली माय लेकराची.”
“त्यावर जी ती गायब झाली, तिचा काईच दुम लागला नाय.”
“मदी कोन म्हनत व्हतं त्या शेरातल्या मोट्या दवाखान्यात हाय म्हुन.”
“कोन बाई जाईल आसल्याची चौकशी करायला?”
“लय वर्स झाली तेला, पाच-सा तरी झाली आसतीली. आता काय म्हाईती कुट आसल, जित्ती तरी आसल का मेली आसल.”
“पळुनच आल्ती न्हव तेच्यासंग?”
“कुटल गं, आशीच फसवल्याली हेनं तिला. कोन यिल बाई आसल्या दारुड्यासंगती पळुन?”
“म्हंजी?”
“ती तिच्या गावातल्याच मानसाबर जानार व्हती, ह्यो तेच्या हाताखाली कामाला व्हता. त्या मानसानं ह्येला मदस्ती घालुन आपल्या पातुर घिवुन याला सांगितल्यालं, ह्यो घिवुन गेला, तिसरीकडच, तेच्याकड नेलीच नाय तिला.”
“सांगत व्हती बया, म्हनली कशी, ह्येनं नेलीच नाय मला तेच्याकड, दुसरीकडच घिवुन गेला, माळावर याकच झोपडं हुत म्हनं त्यात एकटीच व्हती म्हातारी, तीला म्हनाला, रातच र्हातु आन् सकाळच्या पारी जातु. तिलाबी वाटल आसतीली नवरा बायको, रातच्याला कुटं जाईल तरणीताटी बायको घिवुन म्हनुन घेतल ठिवुन. तिनं पन जेवान खान झाल्यावर याकच हातरुनपांघरुन दिल दोगाच्यात, आता सांगल तरी काय तिला बिचारी. आसच फिरवली कुटकुट चार पाच रोज मग आणली घरात.”
“आग बाई, आस हाय व्हय हे!”
“खर, लय चांगल जपायची गं तेला. पायजे नको, जेवनखान, धडुतकपडा तर लखलखीत नुस्ता. हाताला काम नसल तरी सायबावानी थाट व्हता तेचा.”
“लय तरास दिला खरं भाड्यानं, जीव नकोनको करुन सोडला बग पोरीचा. म्हनायची, पिउदे पिली तर, खरं मार येवडा नको बगा.”
“लय हौस हुती संसाराची तिला.”
“कुटलं बाई! एकदा घरात अवदसा शिरली की घर पाण्यात बसतो म्हुन बसत.”
“तसंच की झालय आता, घराला कुणी धनी ना वाणी, पोरं हिंडत्यात एकीकड, त्यो हिंडतोय कुट आणि ती कुणिकड.”
“कोन हाय का त्या पोरास्नी हाकहाळी दिवुन इचारणार?”
“लय वाईट वाटतं बग त्या पोरांच.”
“शाळत जायचं नाय, कुटं खाय मिळल तितच रुंदगळायच. नुस्त पॉट भरलं की झालं. कशाचा इचार नाय पाचार नाय.”
“दोन दिसाच शिळं पुड्यात ठिवल तरी वरीपत्याती.”
“काय करतील पोटाच्या आगीला?”
“आला बग त्यो थोरला.”
“कुट गेल्तास रं”
“गेल्तो म्हसरं घिवुन तळ्याला.”
“शाळत का गेला न्हाइस रं.”
“हंम्म! शाळत जायला कवा टाइम हाय, म्हसरं कोन बगिल?”
“आर ती चड्डी लागली खाली घसराय! वर तर वड की.”
“शेंबुड बग की, निम्मा गेला तोंडात.”
“व्हय तसं मार आडवा हात, काय हासतुस? बारका हाइस का आत्ता?”
“कितवीत हाइस आत्ता?”
“आठवीत.”
“बग कवास दिस गेल्याल कळत्यात तरी का?”
“येवडस हुत हे प्वॉर.”
“शाळत कवा जातुस?”
“नाय गेल्यालो आठ दिवस.”
“आणि ते बारकं कुट हाय.”
“त्यो बी आल्ता तिकडच तळ्यावर आंगोळीला, बसला आसल मासं धरत.”
“आंगोळ करुन आलाय आन् कापडं बगा की.”
“नाय धुतल्याली, आठ दिवस झालं.”
“पप्पा कुटं हाय रं.”
“गेलाय गावाला.”
“मग तुमच्या जेवणाचं कसं?”
“हाय की, परवा भात करुन ठिवुन गेलाय पप्पा.”
“नुस्ता भात खानार व्हय आत्ता?”
“मग काय कोरड्यास आनायचं कुणाकडनं तर मागुन.”
“आय आस्ती तर पॉटभर घातलं आस्तं कनाय लेकरास्नी? कुटं ठिवु कुटं नको झालं आस्तं. सोन्यासारखी पोरं न्हवं का!”
“तुला आठवतिया व्हय रं आय तुजी?”
“आठवतीया की, लय चोक राखायची बग आमास्नी, जरा घाण खपायची नाय तिला. मागल ते घालायची खायला”
“कुटं आसल रं आत्ता ती.”
“मामा म्हनतो हाय तिकडं कुटं लांबच्या गावाला, नेणार हाय त्यो मला तिच्याकडं.”
“जानार हायस तिच्याकडं?”
“व्हय जायचं हाय मला तिच्याकडं, बगुन याचं हवापाणी, इचारायचं हाय तिला, चैनच करायची व्हती तर आमाला कशाला काडलस म्हुन?”
“बग किती कळतं तेला, आतापास्न?”
“का गेली आसल रं?”
“गेली मजा मारायला, तिला काय डोकं आसतं तर आमचा तर इचार केला आसता.”
“बग की न्यायच क नाय तुमाला बी संग, तुमची बी चैनी झाली आसती.”
“आमच्या सारकं नशीबच आसु नये बग कुणाचं.”
“काय कळतं बग की एवड्याशा पोराला?”
“बानं दारु पिली नस्ती आन् आमची आय हित आसती तर कशाला र्हायलो आसतो म्हसर हिंडवत? एकदा दारु ढोसुन पडला तर तेला दुपार झाल्याली बी कळत नाय.”
“बर जा आता बग जा पोटात काय तर घालायच.”
“व्हय जातु.”
“जवळ धराय काय ती तर सुदीची हायती का, एक नंबर हाताळु हाइतं, त्यो दुकानदार तर समोरबी उभं राहु देत नाय.”
“परवा तर ह्या थोरल्याच्या तोंडात ह्यो बुकणा भरल्याला तंबाकुचा, हाक दिल्यावर थुकला तिकडं आन् मग आला बग.”
“काय करायचं बाय.”
“दावं नसल्याल़ ढॉर आन् आय नसल्यालं पॉर, म्हनत्यात ते काय खोटं न्हवं.”
“बाईच्या जातीनं पायसुदीनं आसलं तर बरं, एकदा इस्काळलं की इस्काळलं, कोन नाय घेत परत मिसळुन.”
“खरं पोराकडनी बगुन वाटतंय, हाता तोंडाला आल्याती, आत्ता तर त्यास्नी आय पायजे.”
“काय पोरीची जात हाय व्हय तवा, यवडा इचार करायला, जगतीली कशाबी.”
“सुचली तिला बुद्धी तर यिल.”
“व्हय बाय चल बोलत बसुन भागायच नाय!, आवर बाजारात जाउन यिवुया!, घे पिशवी.”
“चल चल, बाजार उलगायचा वकुत झालाय.”
© मेघश्री श्रेष्ठी.
Comments
खूप छान!
समाज नुसता चर्चेपुरताच असतो हेही कटू सत्य !