"उदास निळे डोळे"

उदास निळे डोळे



दुपारच्या वेळेत मी बाळाला घेऊन पडले होते. इतक्यात दारावर टकटक झाली......
दुपारचे दिड वाजलेले म्हणजे नक्की हेच असणार......
मी उठले. दरवाजा उघडला. दारात हेच होते ..... पण एकटे नाही.....!!
त्यांच्या मागे एक विशीच्या आसपासची,  काळी सावळी, टपोर्या डोळ्यांची चुणचुणीत तरुण मुलगी उभी होती.  मी तिच्याकडे पाहून हसले, तीही अगदी माफक हसली. आत आल्यावर ह्यांनी ओळख करून दिली. "ही आरती, कॉलेजच्या अॅडमिशनसाठी आले, नंदुरबारवरून."
 "हो का... येना..... आरती....!!

       त्या दोघांच आटपेपर्यंत मी ताटं वाढली. 
आम्ही जेवायला बसलो,
“इतक्या दुरून इकडे आलीस कॉलेजसाठी, तुमच्याकडे नाही का कॉलेजची सोय?”

तीनं नुस्तच एकदा माझ्याकडे पाहिलं, परत ह्यांच्याकडे पाहिलं.
“मग हेच बोलले आदिवासी मुलांसाठी इथे शासकीय वसतिगृहाची सोय आहे. त्या मुलांना उच्चशिक्षणासाठी इथेच यावं लागतं.”
“ अवघडच आहे की, इकडे एवढ्या लांब काय गरज हॉस्टेलची?”
“सरकारी योजना काय करणार?” हे म्हणाले,
आरती अजिबात बोलत नव्हती. मी तिला काही विचारलं तरी ती ह्यांच्या तोंडाकडे पहायची आणि हेच उत्तरं द्यायचे. ताटातलं जेवण संपल तरी तिने जास्तिचं काही मागून घेतलं नाही. काही विचारलं तरी नकोनकोच चाललेलं.
जेवण आटोपल्यावर मी तिला म्हणाले, “आरती तुला थोडा वेळ विश्रांती घ्यायची असेल तर झोप.”
थोड्याच वेळात तिला झोप लागली.
“अग ऐकलस काय?” मला ह्यांनी विचारलं.
न ऐकू यायला मी काय बहिरी आहे का? अर्थात हे मी मनातल्या मनातच म्हणाले.
“हं बोला की."
“मला परत थोडा वेळ कॉलेजमध्ये जावं लागेल, आरती आजच्या दिवस थांबेल आपल्याकडेच उद्या तिच्या हॉस्टेलचं अॅडमिशन झाल्यावर ती जाईल तिकडे.”
“बर ठीकाय, पण लवकर परत या.”
झोपलेल्या बाळाचा ह्यांनी पापा घेतला आणि बाहेर पडले. ते बाहेर गेल्यावर मी पण बाळाच्या शेजारी पडले. थोड्या वेळाने परत उठून मी राहिलेली कामं आवरली.
माझी काम आटपेपर्यंत आरती पण उठून बसली.  एवढ्यात दारावर टकटक झाली. चार वाजले.......! म्हणजे नक्कीच थोरले चिरंजीव, दारावरची टकटक एकसारखी सुरूच होती. दार उघडलं तसं, एका हातातली टिफिन बॅग एका कोपर्यात आणि पाठीवरच दप्तर एका कोपर्यात फेकून देत स्वारी घरात प्रवेशली. आल्या आल्या त्यानं आरतीकडे बोट दाखवून विचारलं, “ही कोण?”
त्याच्या त्या धडाकेबाज एन्ट्रीने एव्हाना बाळ पण जागा झालेला, आणि त्यानं भोकाड पसरलेलं.
आधी मी बाळाला जवळ घेतलं.
 “पप्पांची विद्यार्थिनी आहे, तू जा आधी हातपाय धु आणि मग विचार काय विचारायचं ते.”
त्याच्या वागण्याच्या पध्दतीचं आरतीला मात्र जाम हसू आलेलं. अगदी खळखळून हसली ती.
“तसच आहे अगं तो जरा सुद्धा ऐकत नाही.” मी बोलल्यावर मात्र ती पुन्हा गप्प झाली आणि खाली मान घातली. (अरे एवढ काय घाबरायचं पण! तेही मला? आश्चर्याच वाटलं....!! )
“तू चहा घेतेस का?” मी तिला विचारलं.
“नाही” ती एवढच बोलली.
माझ्या प्रश्नाला तिने पहिल्यांदा उत्तर दिलं, तेही नकारार्थी....!!
(नाही घ्यायचं तर नाही घेऊ दे.)  मी माझ्यासाठी चहा ठेवला.  बाळाला आणि थोरल्या चिरंजीवाला दुध गरम करून दिलं.
“ये तू कुठून आलीस? तुझ नावं काये?” चिरंजीवानी तिची मुलाखत सुरु केली.
“नंदुरबार”,
“आरती”
त्याच्या एकेका प्रश्नचं उत्तर ती एकेका शब्दातच देत होती. (आत्ता एवढ्याशा पोराला पण काय घाबरते हि बाया....!!)
“तू पहिल्यांदा राहतेस का घराबाहेर?”
माझ्या प्रश्नावर तिने नुसतच माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की, तिचे डोळे निळे आहेत आणि चमकदार सुद्धा पण त्यात आत्मविश्वासाचा लवलेशही नव्हता.
“अग मम्मे ही अशी काय बोलते गं? हिला मराठी नाही काय बोलता येत?”
आत्ता ग्रॅज्यूएशन करण्यासाठी आलेल्या मुलीला मराठी येत नाही हे कस बरं शक्यय?
एव्हढ्यात फोनची रिंग वाजली, ह्यांचाच होता, “हॅलो”
“हॅलो, मॅडम.....! (एक छोटा पॉज घेऊन) चहा घेतला का?”
“हो घेतला.” (हे मात्र एकाच श्वासात.) काहीशा फणकार्याने.
“मॅडम...!! (परत ए.छो.पॉ.) अहो, चिडताय का एवढं? चहा घेतला ना, आलं टाकून घेतला कि बिन आल्याचा घेतला?”
आत्ता खर तर मला हसू आलेलं पण तशीच लटक्या रागानं, “बिन आल्याचा.”
मी हसतेय म्हणजेच फसलेय, याचा पुरेपूर अंदाज बांधल्यावर.
“बर..... बाळांनी माझ्या काही खाल्लं का?”
“हो... खाल्लं.”
“आरतीने घेतला का चहा वगैरे काही.”
“नाही.”
“नाही..? तू विचारलं नाहीस तिला, अगं विचारायचं न? काय हे.....”
“अहो, विचारलं.....पण ती चहा घेत नाही म्हणे?”
“म्हणे...(म्हणे वर जरा जास्तच जोर देत) आणि काय म्हणे?”
“काही नाही”
“बर हे बघ, ती जेवढ बोलेल तेव्हढंच बोल तिच्याशी, उगाच डोकं नको खाऊ...”
“आत्ता मी काय खाणारे तिचं डोकं?”
“अगं तसं न्हवे, तिचा थोडा प्रॉब्लेम आहे...जरा टेन्शन मध्ये आहे बिचारी जास्त काय लांबड लाऊ नको, एव्हडच बाकीच सांगेन मी उद्या हं.”
“हं बरं”
“बाय डीअर”
“बाय.”
दुसर्या दिवशी दोघांनीही सकाळी आवरलं आणि एकत्रच बाहेर पडले. थोरल्या लेकाचा डबा वगैरे आवरून देऊन, त्याला शाळेत पोचवला. घरात मी आणि बाळ दोघेच.
दुपारी दीडच्या दरम्यान आरती एकटीच घरी आली.
“मॅडम.... सरांना यायला उशीर होईल, आज मी मैत्रिणीकडे जाते राहायला, ती न्यायला येईल.”
आल्या आल्याच तिने सांगून टाकलं.
“बर जेऊन तरी घे” मी तिची वाट पाहत जेवायची थांबलेली आणि ही सांगतेय मी मैत्रिणीकडे जाणारे. जाऊदे जायचं तर काय करणार.
मी ताटं वाढली. एका अक्षराचाही संवाद न होता आमचं जेवण आटोपलं.
जेवण आटोपल्यावर ती नुसतीच बसून राहिली. एकटक शून्यात नजर लाऊन.
“न राहवून मीच विचारलं कोण आहे तुझी मैत्रीण इथे?”
“अश्विनी”
“तुझी कशी ओळख तिच्याशी? गावाकडची आहे का?”
“नाही”
“मग”
“इथलीच आहे”
तिच्या त्या तुटक बोलण्याने तिला पुढे काही विचारावस वाटलच नाही.
थोड्या वेळाने दारावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला. आज आरतीला तिच्या मैत्रीकडे जायचं होतं, ती वाटच पाहत बसलेली.  अधूनमधून फोन सुरु होतेच तिचे, त्यामुळ ती झोपली न्हवती. दरवाजा उघडला तर, दारात अश्विनी.
“अरे व्वा....तू कशी काय इकडे? बर्याच दिवसांनी....”
“सर काही बोलले नाहीत का तुम्हाला? कालच ठरलेलं आमच आज घरी भेटायचं म्हणून..... तिने आल्याआल्या इकडेतिकडे नजर टाकली.... आले नाहीत वाटतं अजून?
“हो.... नाही आले...”
आरती तिच्याकडेही नुसतीच पाहत होती.
“अगं हि नवीन मुलगी आले आरती...अॅडमिशनसाठी....”
“हि माहितेय मला....तिलाच न्यायला आले मी....”
“अच्छा म्हणजे तूच का तिची मैत्रीण? पण तुमची कशी काय ओळख?”
“माझ्याच क्लास मध्ये होती गेल्या वर्षी पण तिला एटीकेटी लागली.”
“अच्छा असं आहे का? तेच विचारतेय मी तिला, तुझी कशी ओळख? पण ती काहीच बोलत नाही.”
“ती तशीचे.... आरतीच्या तोंडातून एक शब्द निघाला तर शप्पथ.... दोन वर्ष तिला बोलत करण्याचा प्रयत्न करून आम्ही दमलो सगळे..”
“नाही गं तिला मराठी येत नाही व्यवस्थित ... म्हणून असेल....”
“काय माहित पण कधीच उघडत नाही तिचं तोंड.... आत्ता काय तिच्या हॉस्टेल अॅडमिशनचा प्रॉब्लेम आहे वाटतंं....सर म्हणाले तुझ्याकडे घेऊन जा...मग न्हेते आत्ता तिचं काम होईपर्यंत....”
मी अश्विनीसाठी चहा ठेवला...
आमचा दोघींचा चहा होईपर्यंत आरतीने बॅग आवरली.
अश्विनी आणि माझ्या इतक्या गप्पा चालू होत्या तरी आरती एका अक्षराने बोलली नाही.
त्या दोघी निघून गेल्या...
रात्रीच्या वेळी आमचं जेवण वगैरे आटोपल्यावर....
मी ह्यांना म्हणाले, “काय झालं आरतीच्या अॅडमिशनच?”
“बघू आज तरी काही नाही झालं, मला वेळ नाही मिळाला.... तिच्या होस्टेलवर जायला...”
“मग ती अश्विनीकडे का गेली? इथे काय प्रॉब्लेम होता तिला?”
“अगं मैत्रिणी आहेत दोघी... एका क्लास मध्ये शिकलेल्या...”
“कसल्या मैत्रिणी? एका अक्षरानं बोलली नाही ती पोरगी...इथे एव्हढ एक दिवस राहिली तरी काही बोलली नाही.”
“अगं त्यांची आदिवासी बोली भाषा वेगळी असते....त्यांना आपली मराठी येत नाही.”
“असं कसं येत नाही? एव्हढ ग्रॅज्यूएशनला आलीच कशी मग ती?”
“अगं तीच तर बोंब आहे इथल्या शिक्षणव्यवस्थेची..... काय कसं बसं पुढं ढकलत न्यायचं की काम झालं.”
“कितीही कसबस पुढे ढकललं तरी कुठे तरी अडकणारच न...” काही केल्या मला हे अजब कोड उलगडत न्हवतं.
“ये बाई तू झोप बघू आत्ता....”
“का? तुम्हाला काय झालं?”
“अगं झोप आत्ता.... दमली असशील....”
“काही नाही दामले.... पण जसं येत तसं तोडकमोदक तरी तिने बोलायला हव होत.... प्रेमशीपण निट नाही बोलली ती.... बाळाशी पण नाही.... एव्हढं छोटं बाळ बघितल्यावर तरी किमान त्याच्याशी हसतं बोलतं की नाही एखादं माणूस... हे काय अजबच वागणं नुसतच त्या समोरच्या झुडुपात नजर लाऊन बसायची....”
“तिचा थोडा प्रॉब्लेम आहे गं”
“ कसला प्रॉब्लेम? काय वेडीबिडी आहे का काय?” माझा पारा चाढतणीला लागलेला.
“तसच आहे असं समज”
“समज काय समज.... सरळ सांगा कायय ते....”
“तिचं एका मुलावर प्रेम होतं, तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं”
“माग नाही केलं तर नाही केलं....! त्यात एव्हढं वेड लाऊन घ्यायची काय गरज?”
“अग हो...! ऐकून तरी घे...!”
मी तोंड बंद केलं.
“त्यानं तिला पळवून नेली आणि लग्न केलं, तो तिच्याच गावातला पण, सवर्ण समाजातला हि आदिवासी...  घरचे मारतील वगरे सांगून तिला दूर कुठेतरी नेली ....तिच्याशी लग्न केलं... पण तो अजिबात चांगलं वागायचा नाही हिच्याशी... दिवसदिवसभर डांबून ठेवायचा.... मारहाण करायचा.... तिच्या अंगावर अजून वळ आहेत त्यानं मारलेले.... हातावर, तिच्या मांड्यांवर सिगारेटचे चटके द्यायचा.... अक्षरशः खूपखूप छळ केला तिचा.... मग त्याच्या घरातल्यांनीच ह्यांना शोधून काढलं.... गावात आणलं आणि हिला हिच्या घरी सोडलं. सगळ्या गावासमोर त्यांनी सांगितलं कि हिनीच त्याला फूस लावली... हिला आम्ही स्वीकारणार नाही... काय करायचं ते करा....”
बिचारीची कर्मकहाणी ऐकल्यावर मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. “ मग काही महिने ती घरी राहिली. गेल्या वर्षी इथूनच ती पळून गेलीली हॉस्टेलवरून आणि त्यांचा असा रूल आहे कि, एकदा हॉस्टेल सोडलेल्या विद्यार्थ्याला ते परत घेत नाहीत. बघतोय आत्ता..... मी आणि प्राचार्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतोय पण, ते काय ऐकायला तयार नाहीत.”
यापुढे मला काहीच विचारावसं वाटलं नाही... तिच्या मौना मागचा एवढा भयानक अर्थ कळाल्यावर मी मातीमूढ झालेले. त्या सुंदर निळ्या डोळ्यातल्या भयाण उदासतेचा अर्थ मला आत्ता समजत होता. आपण निष्कारण तिचा रागराग केला...माझीच मला चीड येत होती.
दुसर्या दिवशी अश्विनी आणि ती दुपारच्या वेळेत परत आल्या.
“काय झालं.... काही बोलली का ती तुझ्याशी....” मी अश्विनीला विचारलं.
“छे....! काहीच नाही.”
“मग होस्टेलच अॅडमिशन नाही झालं तर काय करणारे ती?”
“तेच विचारतोय आम्ही तिला.... काय करतेस ... एव्हढ्या लांबून आलीच आहेस तर... दुसरीकडे कुठे सोय करू पण अशीच परत नको जाऊ.”
मी आरतीला विचारलं... "तुला दुसरीकडे कुठे नाही का जमणार राहायला...”
“नाय भाऊ आणि आई बोलते, खर्च व्हईल जास्त आमाला जमणार नाय.”
खरच होतं त्यांच, पण ईतक्या दुरून येऊन रिकाम्या हातांनी माघारी जाणं मला पटत नव्हतं.......
"अग थांब थोडे दिवस बघूया काय होतंय का काही तरी सोय नक्की होईल."
मी आपलं असच म्हंटल पण, खरच काही सोय होईल की नाही याचा मलाही काही अंदाज नव्हता, पण तिने परत जावं असं मात्र मला अजिबात वाटत न्हवतं एव्हढं नक्की.

"हां... काही तरी मार्ग निघेल, म्हणजे तू जर कुठे जॉब वगैरे केलास, कॉलेज सांभाळून तर काही गरज नाही परत जायची....रूम आणि मेसची सोय पण बघता येईल कमी खर्चात..." अश्विनी बोलली.
"पण ही आहे अशी, काही बोलणार नाही, नुस्तीच मक्ख बसून राहणार मग जॉब मिळणं पण अवघडचय ना...! बघ मग काय करणार ठरव तुझ तु काय ते.... आत्ता राहा इथे राहणार असशील तर परत वाटलं तर माझ्याकडे ये. फोन कर मला मी यिन न्यायला ......" मग थोडा वेळ इकडतिकडच्या गप्पा झाल्या.... अश्विनीचा सिक्स्थ सेमिस्टरचा रिजल्ट यायचा होता त्यानंतर पुढे काय करायचं? शिकायचं? की कुठे जॉब करायचा? अशा द्विधा मन:स्थितीत ती होती.  तीही सध्या जॉब करत होती. त्यामुळं जास्त वेळ थांबायला वेळ नव्हता... ती गेली ......
पुन्हा आम्ही दोघीच.
आरतीने पुन्हा शून्यात नजर लावली. आश्चर्य वाटायचं या पोरीचं मला, तासनतास ती तशीच समाधी लागल्यासारखी बसून राहायची. एखाद्या निर्जीव पुताळ्यासारखी..... आणि तिचे ते निळे पाणीदार डोळे ....... उदास उदास....
मला तर अजिबात राहावायचं नाही, तिला तसं बसलेल बघून. मग उगाच बाळाकडे लक्ष ठेव. हे आण, ते आण करत मी मुद्दामच तिची तंद्री मोडायचा प्रयत्न करायची. तिला वाटलच कधी तर ती फक्त बाळाशी बोलायची नाही तर, इतर वेळी नुसतच मौन पांघरून बसायची...... गप्प गप्प उदास.......
"काय झालं हिच्या अॅडमिशनच?"
मी ह्यांना विचारलं,
"त्यांचा रूल आहे, एकदा सोडून गेलेल्या विद्यार्थ्याला कुठल्याही कारणांनी परत घेत नाहीत. दुसरीकडे कुठे सोय करता येईल पण, पैश्याचं काय? तिची परिस्थिती नाही. "
आपल्याकडे राहिली तर......! मी स्वतःशीच विचार केला पण, तेही जमण्यासारखं नव्हतच. आम्हाला कधीही उठून घरी जावं लागणार, कोणी पाहुणेमंडळी येणार जाणार, सगळी अडचणच झाली असती.... तरी, कुठे तरी कॉट बेसिसवर राहिली असती तर, जेवायची सोय आपल्याकडे करता आली असती.  पण हे यांना पटायला हवं आणि स्वतः तिलाही पटायला हवं. तिने परत जाण्याचं पक्कच केलेलं.
"तिची इच्छा नको का इथे राहण्याची? तीने ठरवलंय परत जायचं, तिच्या घरची परिस्थिती नाही  बाहेर राहून शिक्षण देण्यासारखी", हे मला म्हणाले....

आरती नुसतीच एकदा माझ्याकडे एकदा ह्यांच्याकडे कावर्याबावर्या नजरेनं पाहत होती पण, बोलत नव्हती.
दुसर्या दिवशी दोघं आवरून कॉलेजला गेले... मी घरातली कामं आवरून नेहमीसारखीच बाळाला घेऊन पडून राहिले...त्याची सवयच झालेली..... झोप आली कि त्याला नुस्त घेऊन पडून राहायचं तो शिरता येईल तितकं अगदी आत पोटाशी चिकटून झोपायचा. त्याला पूर्ण गाढ झोप लागल्याशिवाय मला जराही हलता यायचं नाही.
माझ्या आत खोलवर, आरती घोळत होती.... मी डोळे मिटलेले.... उलटसुलट विचार सुरूच होते.... आपल्याकड ठेवायचं म्हंटल तरी तिला हाताळणं अवघडच होतं... तीची मानसिकता अगदीच विस्कळीत झालेली.... पुढे आपल्यालाच नाही पटल तिचं काही तर.....
इतक्यात अचानक मला आठवलं की इथे माहेर नावाची एक संस्था आहे जी अशा निराधार मुलींना आधार देते... त्याबद्दल काही चौकशी करून पाहूया....
दुपारी ती दोघं घरी आल्यावर मी ह्यांच्याजवळ सांगितलं.... पुस्तक आणि लेखकाच्या नावाचा संदर्भ देऊन ह्यांना विचारलं, "इथे रत्नागिरीतच असेल ना ती संस्था..."
" बघूया चौकशी करून ...."

ह्यांनी दुपारनंतर माहेर संस्थेची माहिती घेतली....
पण त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या मुलींची सोय न्हवती.... पण त्यांनी आणखी एका शासकीय वसतीगृहाच नावं सुचवलं. दुसर्या दिवशी हे जाऊन त्या वसतिगृहाची चौकशी करून आले. तिथले नियम आणि अटी फारच जाचक होत्या पण, राहण्याची आणि जेवण्याची मोफत सोय होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनही ते वसतिगृह चांगलं होतं.
तिथल्या नियमानुसार आरतीच्या पालकांनी महिन्यातून एकदा किमान तिची भेट घेणं बंधनकारक होतं. पण तिच्या घरच्यांनी नकार कळवला..... मग आम्हीच तातपुरते तिचे पालक झालो...
तिथल्या नियमानुसार सगळ्या अटी पूर्ण केल्या आणि दुसर्या दिवशी हे तिला त्या हॉस्टेलवर सोडून आले. ते निराधार महिलांसाठीचं वसतीगृह होतं... त्यामुळे फोन वापरणं, तिथून बाहेर पडायची आणि आत जायची वेळ पाळणं थोडं जिकिरीचं होतं. आरतीला फक्त तिच्या कॉलेजच्या  वेळेतच बाहेर सोडलं जाई. इतरवेळी जर काही कॉलेजच्या कामासाठी थोडावेळ जरी जास्त थांबव लागत असेल तर आदल्या दिवशी प्राचार्यांच पत्र दाखवावं लागे. परीक्षेच्या वेळी तर फारच अडचण व्हायची कारण अचानक वेळा बदलेल्या असायच्या.... या सगळ्याची कसरत साधून तिने शेवटचं वर्ष कसंबसं पार केलं.
ज्या दिवशी ती त्या वसतीगृहावर राहायला गेली, त्यानंतर तिची माझी भेट कधीच झाली नाही. तिथल्या नियमाप्रमाणे  हे महिन्यातून एकदा तिला भेटून यायचे, अडचणीच्या वेळी तिच्या वसतीगृहाच्या अ्धीक्षकांशी बोलून घ्यायचे. पण तिथेही तिला जुळवून घेणं अवघड जात होतं. वसतिगृहाच्या नियमानुसार तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु केले... त्याने दिलेल्या सिगारेटच्या चटक्यांंमुळे तिच्या नाजूक भागात जखमा झाल्या होत्या आणि हे तिने सर्वांपासून लपवून ठेवलेलं. पण तिथल्या वैद्यकीय तपासणीमूळे हे माहिती झालं... नंतर त्यांनी तिच्यावर मानसिक उपचारही सुरु केले.
मला काही तिला भेटणं शक्य व्हायचं नाही मी यांच्याजवळच तिची चौकशी करायची....कॉलेज मध्ये आल्यावर तिला जमेल तेंव्हा तीही माझी, बाळाची, प्रेमची विचारपूस करायची.  
"तिच्यात काही बदल झालाय असं वाटतय का आत्ता?"
मी ह्यांना विचारलं,
"फारस काही नाही पण, आत्ता किमान थोडं इतर मुलींशी बोलणं वगैरे तरी होतं... मुली पण सारखी तक्रार करत असतात, घुम्यासारखी बसते, बोलत नाही.... कुणाला काही माहिती नसल्यामुळं बोलतात, त्यापण तशा .... पण मी सांगतो, एक वर्ष आपल्याला तिला सांभाळून घ्यायचय....होस्टेलच्या रेक्टर पण परवा तक्रार करत होत्या, एकही काम वेळेवर नाही करत नुसतीच बसून राहते इतर बायकांसोबत पण बोलत नाही...इथली कामं वाटून घेऊन करावी लागतात. हिला कळत नाही काही.... काही झालेलं.... त्रास झाला काही तब्बेतीचा तर ते पण लवकर सांगत नाही.... आम्हाला काळजी वाटते तिची.... असं बोलत होत्या...."
हे ऐकून तर मला अजूनच वाईट वाटलं....
आयुष्याच्या एका अवघड वळणावर तिने जो आघात सोसला तो प्रचंड भयानक होता.... त्याची गडद अंधारी सावली कायम होतीच तिच्या सोबतीला.... ज्यामूळं तिचं अख्खं आयुष्याच झाकोळून गेलं होतं... चाचपडत होती ती त्या अंधारातच. तिची इच्छाही नव्हती, त्या सावलीपासून स्वतःला तोडून मनमुराद जगायची. तिचं जगणच जणू कुणी हिरावून घेतलं होतं तिच्यापासून. प्रेम करण्याची शिक्षा किती क्रूर असते हे कळून चुकलं होतं तिला.
आजही कधी कधी मला तिची आठवण आली की  प्रश्न पडतो....
'त्या टपोर्या निळ्या डोळ्यांतील उदासीचा  गहिरा डोह आत्ता निवळला असेल की, ते तसेच त्या उदासीच्या गहिर्या डबक्यात घुसमटत राहिले असतील. जगण्याच्या वाटा अजून खूप सुंदर आहेत, हे तिनं जाणलं असेल की, निराशेच्या काळ्या दुलईत ते उदास निळे डोळे शुष्कतेने निपचित पडले असतील....? काय झालं असेल त्या उदास निळ्या डोळयांचं.....?'


मेघश्री श्रेष्ठी-नाईक.


Post a Comment

2 Comments

Vegabond said…
नव्वदच्या दशकांत गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक, 'माहेरची साडी' हा सासुरवाशीण स्त्रीचं दुःख मांडून गेला त्याच अंगाची हि कथा म्हणावी लागेल. कथेच्या मध्यावर येईपर्यंत आरतीचं वागणं अस्वस्थं करत. अन शेवट होतो तो तिच्या निळ्याशार डोळ्यांनी उदासीनता सोडली की नाही या प्रश्नांनी. आजही कितीतरी आरतीचं शोषण या समाजात केलं जात व तिला त्यावर न्यान न मिळत खराब चारित्र्याची म्ह्णून हनन केलं जात.
प्रस्तुत कथेतील आरती एक 'गरीब आदिवासी मुलगी' ही तिहेरी शोषणाची शिकारी आहे हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात येईल. तिच्यावर पहिला अन्याय हा ती स्त्री आहे म्हणून घडतो; दुसरा ती आदिवासी आहे म्हणून; तर तिसरा अन्याय गरिबी करते. यासर्वांमधे तिचं शुन्याकडे बघत, उदासीन व घुम्यासारखं जगणं संवेदनशील मनाला खटकले ही, परंतु ती अन्यायाविरुद्ध आवाज करणारी, आपलं बोलणं आपल्यावरचा अन्याय यावर भाष्य करणारी असती तर नक्कीच अशा कितीतरी आरती आज घुम्यासारख्या निव्वळ जगत आहेत ते आपल्या समोर येतं नाही. जर या आरतीचं अबोल राहणं घुम्यासारखं राहणं मनाला बोचत असेल तर इतर आरतीचा विचार हि आपण क्षणभर केला पाहिजे असं नकळतपणे ही कथा सांगून जाते.
Meghashree said…
धन्यवाद मुकुंदराव.