सावधान….कोर्ट फितुर आहे!!


मला कुणीतरी आवाज दिला. व्यक्ती परिचित वाटली.
“तुम्हाला बोलवलय कोर्टात.”
“मी काय केलं?”
“ते तिथं येऊन विचारा.”
“आत्ता नाही जमणार.”
“यावच लागल.”
“ऊन किती झालय, मला त्रास होतो, ऊनाचा.”
“ऊनाचा कसला त्रास? एवढं साजुक होऊन जमत नसतय चलाच.”
“पोरगं?”
“नको पोरगं, ठेवा घरातच.”
“असकसं? रडल ना ते.” कळवळुन.
“रडू दे.”
काय माणूस तरी, एवढ्याश्या माझ्या लेकराला रडू दे म्हणतो. त्याच्या मागुन गेल्या शिवाय पर्याय नव्हता. मुलाला ठेवलं घरातच.
मी त्याच्या मागमाग, तो पुढपुढ. रणरण ऊन. काय झालय माहित नाही, कुणी बोलवलय माहित नाही, का बोलवलय माहित नाही. हा माणुस म्हणतो म्हणुन याच्या मागमाग जायच. त्याला आपण ओळखतो का नीट हे पण माहित नाही.
पायांना घाम सुटलेला, चपलातुन पाय सटकत होते. पदर डोक्यावर घेतला तर, मान घामानं भिजती, नाही घेतला तर, डोकं ऊनानं भाजतय. मग लक्षात आलं, याच्या गडबडीत केस पण नाही विंचरल, तोंडावर पाणी पण नाही मारलं, कसे दिसत असु आपण? विचारावं का यालाच? छे….! परक्या माणसाला बाई माणसानं कायपण विचारायच नसतं. मुर्ख!
पायाला घाम सूटल्यानं भरभर चालणं जमत नव्हत. त्याच्यात आणि माझ्यात अंतर पडल की तो डोळ वटरून बघायचा. जणु त्याच्या तशा बघण्यानं मी भस्मसात होणार होते.
एका बसक्या घराजवळ तो थांबला.
एकच पायरी ऊतरुन आत जायचं. तिथंच एक पाण्याची टाकी, त्याच्याखाली जर्मनच घमेल, बाजुला धुण्याचा भांड्याचा साबण. फरशी स्वच्छ धुतलेली. म्हणजे कपडे धुतल्यान ती आपोआपच स्वच्छ झाली असेल. वर कपडे सुकत घातलेले, साबणाचा ओळखीचा दर्प, ओळखीच्या त्या वासाचाही थोडावेळ आधार वाटला.
आत जायला एक दरवाजा, बाजुला एक खिडकी.
आत गेल्यावर समोर दिवाण, एका कोपर्यात टिव्ही. तिथुन आत एक सोपा. तिथुन वर जाणारा जिना. तिथुन आत एकच मोठी पायरी. थोड्याच अंतरावर ओटा. ओट्याच्या बाजुला दरवाजा.
ओट्यावरुन गॅस खाली घेऊन एक बाई भाकऱ्या थापत होती.
तो म्हणाला, “हेच कोर्ट.”
मी हसले, त्या कोर्टाकडे पाहुन.
कोर्टही हसलं माझ्याकडे पाहुन.
कोर्टाने माझ्यावरच्या आरोपांची यादीच वाचली.
पहिला आरोप होता, ‘मी एका साध्या सरळ सज्जन मुलीच्या इज्जतीचा बोभाटा केला.’
“ते कस काय?” मी.
“ती पोरगी सांगते म्हणुन.”
“काय सांगते, ती?”
“हेच की, तिचं त्याच्यावर प्रेम होत हे तू सगळ्या पै-पावण्यात सांगितलस.”
“मी नाही सांगितल, तिनच सांगितल.”
“ती कस सांगेल स्वत:च?”
“होय सांगते ती सगळ्यांना, त्यानं कसं फसवल, फसवतोय अजुन. पण, सगळ्यांनीच त्याची बाजू घेतली, सगळ्ळसगळ्ळं सांगते ती.”
“तुला कस कळलं?”
“सगळे म्हणतात मला तसं. त्यान चांगल नाही केलं.”
“मग तूच आधी घातलं म्हणे तिच्या डोक्यात?”
“मी काय घालणार तिच्या डोक्यात?” मला हसूच आलं. कोर्टाला राग आला. तिनं डोळे वटारलं. मी गप्प.
“तूच बोलायची तिच्याशी, जास्त.”
“नाही, ओ मला काहीच नाही माहिती.”
“मग तू तिला विचारलस, तुमचं काय चाल्लय म्हणुन.”
“होय, कारण, ती दोघं असली की मला वगळून टाकायचीत. मला बाहेर जा म्हणायची, म्हणुन, विचारलं एवढं चोरुन काय बोलताय?”
“आत्ता ती दुसऱ्या कुणासोबतच लग्न करणार नाही म्हणतेय, खर आहे का?”
“हो बरोबर. पण तो आत्ता तिच्याशी लग्न करणार नाही म्हणतोय.”
“तो तिला बोललाय तुझ्याशीच लग्न करणार म्हणून.”
“अस तो सगळ्यांसमोर नाही म्हणत फक्त तिच्यासमोर म्हणतो.”
“तीचं लग्न त्याच्यासोबत करणारच नाही आम्ही, फक्त तिच्या डोक्यातून ते जायला हवंय.”
आत्ताही हसायच होत मला पण नाही हसले, जाऊदे, सगळं संपल एकदाच की एकदमच हसता येईल.
कोर्टाच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.
“त्या भिकाऱ्या कडे काय आहे? खायला तर मिळेल का पोटभर!”
“होय, खर आहे, भिकार्याशी कुणी कशाला लग्न करावं, करुच नये.”
बोलत बोलत कोर्टानं मला चहा पाजला, वरुन भाकरी न कारल्याची भाजीपण घातली खायला. मला त्या कारल्याच्या भाजीची रेसीपी पण सांगितली.
कोर्ट तस खुपच प्रेमळ आहे.
‘भिकाऱ्याशी कुणी कशाला लग्न कराव’ एवढ्याच वाक्याचा संदर्भ घेऊन, माझाच त्यांच्या लग्नाला विरोध असल्याच कोर्टानं त्या दोघांना समजावुन सांगितलं.
हा निर्णय तिला मान्य नव्हता, तिने बरेच प्रयत्न केले. पण कोर्टानं तोच निकाल कायम ठेवला.
नाईलाजान दोघांनी आपापल्या वेगळ्या वाटा स्वीकारल्या. आपापल्या वेगळ्या आयुष्यात, संसारात छान रमलेत दोघ.

तरी मीच तीची नाहक बदनामी केल्याच्या आरोपावर कोर्ट ठाम आहे.
शिवाय अजून बरेच आरोप आहेत माझ्याविरोधात प्रलंबित. आरोपांची यादी वाचुन कोर्टाला कधीकधी माझी खुप दया येते. मग ते मला खाऊ घालत, तस खुप प्रेमळही आहे. पण तरीही मी आरोपी आहे याचा विसर नाही पडत त्याला.
कोर्टपण थकलय सध्या किती व्याप सांभाळायचा तो!
मग जमेल तस जमेल त्यावेळी त्याच त्याच काम सुरू होत. मग त्या त्या वेळी मलाही जावच लागत, नाईलाजानं.
परवा असच भर पावसात जायची वेळ आली, घरात जुनी छत्री होती त्याच्या दोन काड्या तुटलेल्या, पण असो डोकं तर शाबुत राहिलं असतं. त्या तुटक्या छत्रीतून पाठ भिजत होती, खाल पर्यंत, न आतुन घामही निथळत होता. ओल्या पाठीवर काहीतरी रुतत होत.
त्या तशा अवतारात आल्याबद्दल कोर्टानं समज दिली आणि नवी छत्री घ्यायचा आदेश पण दिला.
कोर्टाची प्रश्नोत्तरं सुरु झाली,
“तू सासुरवाशिणी सारखी अजिबात राहत नाही, का बरं?” कोर्टाचा प्रश्न.
“म्हणजे कस?” माझा प्रतिप्रश्न.
“हे बघ हेच! सगळ्यांना तू उलट प्रश्न कस काय विचारते? सासुरवाशिणीनं सासर घरात असं वर तोंड करुन बोलु नये.”
मी तोंड खाली केलं.
“घरात तुझं लक्ष नसतं, कुणाला कस बोलावं ते पण कळत नाही तुला.”
आत्ता काय बोलणार! बोलल की म्हणणार वर तोंड करुन बोलते.
“बोलत पण नाही तु कधीकधी उगीच गप्प गप्प राहते.”
“तस नाही कधी घाई असते, कधी माझ्याशीच नाही बोलत कुणी, मी…..मी…...बोलल...तरी वेगळा अर्थ काढतात…..”
“हे बघ, ते काय तुझे शत्रू नाहित, त्यांच्या मनासारख केलं म्हणुन काही बिघडत नाही, कधीमधी त्यांच्यासाठी टाकल्यास रजा म्हणुन काही आभाळ कोसळत नाही. बरोबर ना!”
“हो बरोबर.” मी मान हलवली.
“कधी भाजी खारट करते, कधी मीठच नसतं, कधी करपून टाकते, किती सहन कराव तूझं?”
“हो ना.” माझा आवाज कापरा झाला. पदर खांद्यावरुन पुढे घेऊन, मी मान खाली घातली. हो नं कोर्टाचा आदेशच होता तसा मान वर करून बोलायचं नाही.
“घरातल्या धाकट्या दिरांना नणदांना कस बोलवते तू? ये-जा करतात का त्यांना, लहान असले म्हणुन?” घरचे असे रितीरिवाज मोडुन मी गुन्हाच केला होता, नाही का! मी माझी चुक मान्य केली.
“बर त्यांना नाही करणार ये-जा, मान ठेविन, पण माझ्या लेकरांसारखच सांभाळते त्यांना.”
“ते सांभाळायचच असतं, त्यात काय एवढ विशेष!”
कमाल आहे, कधीकधी बिघडलेल्या भाजीवर इतका वैताग आणि रोज सकाळपासुन संध्याकाळ पर्यंतची खर्डेघाशी कधी बोलुनही दाखवायची चोरी.
असा एकांगीच विचार कसा काय करू शकत बरं कोर्ट?
“त्या मुलाला पण धड सांभाळू शकत नाही तू! किती आजारी पडतं ते सारख!” म्हणजे मी एक निष्काळजी, बेफिकीर आई होते कोर्टाच्या नजरेत.
“हो तो थोडा नाजुक आहे.”
“आपल्या मुलासाठी नको का जरा कष्ट घ्यायला, आई व्हायचं तर तेवढच झिजावं लागतं.‌ नुसती पोरं काढली म्हणजे झालं काय? मजाच मारायची मग, नुसता नवरा घेऊन.”
मी गप्पच राहिले.
“सारखं यालात्याला फोन करत बसायची गरजच काय? जरा आपला नवरा, संसार, घरदार, घरची माणसं, रितीभाती  निदान माहिती तर आहेत का? मुरवतपणानं शिक वागायला, उगच टुळूटुळू हिंडु नको, नोकरीच्या नावाखाली.”

आता तर आरोपांची हद्दच झाली.
मी तडक उठले, तिथुन बाहेर पडले. मी कोणाच्याच आरोपांना आता भिक घालणार नाही.
   पण, यावर कोणती शिक्षा ठोठवावी, याबाबत कोर्ट संदिग्ध आहे, तारीख पे तारीख हाच कोर्टाचा जुना रिवाज सुरू ठेवावा जे होईल ते होईल असं चाललय कोर्टाचं.
तूर्त अशा फितुर कोर्टाला मीच वाळित टाकलय.
© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.
   


Post a Comment

4 Comments

vishwas said…
जबरदस्त रे मेघश्री ...प्रवाही लेखनशैली अन् ओघवती भाषेचा सुंदर मिलाफ. लेखन असेच बहरत राहो... लिखते रहो..
Anonymous said…
दोन पिढ्यांच्या मधल सध्या कैक घरात दिसणार हे चित्र. काहीजण दुर्लक्ष करुन तारखा वाढवतात तर काहीजण निकाल घेउन पुढचा प्रवास करतात.
आरोपी मात्र कोन हे सिध्द मात्र होत नाही.

मस्त मांडणी केलात.
छान लिहिलंय.. एकदम सरस
Avani patil said…
प्रभावी भाषाशैली. अगदी उत्तम लेखन
keep growing