पोरकी


सकाळचं तिरप ऊन वरवर चढत होतं. एका हातात चहाची किटली आणि दुसर्या हातात कपड्याचं बोचकं घेऊन सुखुबाई लगबगीन चालली होती होती. भराभरा चाललं कि हातातली किटली डचमळायची.  डचमळणारी किटली आणि दुसर्या हातातलं ते बोचकं सावरत ती निघाली होती.
“काय वं ताईसाब कुटं निगालासा?” माळावरनं घराकडं निघालेल्या शांताक्कान तीला हटकलं.
“काय नाय बाय, सुजीला दवाखान्यात नेलिया पहाटेला कळा सुटल्याता, अजून डॉक्टरचा पत्ता नव्हता, सिस्टरनीला बी सकाळी जाऊन उठवून आनली. म्हनल जरा च्या तरी देवावा म्हून आल्तु.”
“अगं बाय पोरगी तेवडी हातापायानं धड सुटू दि म्हंजी झालं."  शांताक्का काळजीन बोलली.
तायसाब उचला भरारा पावलं अवघडल्या पोरगीला एकटीला टाकून आलायसा काय म्हणायचं तुमासनी.”
“व्हय बाय चल.”
दोघी भराभरा चालत दवाखान्याजवळ पोचल्या.
सुजी वाकून पोट धरून एकटीच फिरत होती. पाटलाची म्हातारी सकाळीसकाळीच आलेली दवाखान्यात. तेवढी तिचीच सोबत होती सुजीला. सखुबाईनं आणलेलं समान समोरच्या बाकड्यावर ठेवलं. ती सुजीजवळ जाताच सुजीनं तिचा हात घट्ट पकडला.
“आय लय दुखतंय बाय.... आय काय करू गं आय...” सुजीला कळा असह्य झालेल्या.
“दुखतंय बाय तसच, तेला काय करायचं वाइज च्या घी म्हंजी जरा बर वाटल बघ, कळा घालय ताकत यील.”
“ काय व्हइक तर म्हनावं बाई अजून पत्ता नाय बग कुणाचा. काय म्हून एकट्या अवघडल्या पोरीला टाकून गेलीस गं सखू आ? काय शनी का खुळी.” पाटलाची म्हातारी वैतागानं बोलली.
“काय करणार बाय म्हातारे कोण हाय का घरात आमच्या मागचम्होरच बगाय.”
“आग पर बग कि धा वाजाय आलं तरी कुणाचा पत्या नाय. डाक्टर बी नाय आणि सिस्टरबी नाय. काय करायचं अशा अडलेल्या बाईमाणसानं?” म्हातारी बोलली.”
"खर हाय बगा आत्या.” शांताक्का म्हणाली.
सखुबाईन किटलीतला चहा टोपणात ओतला.
सुजीच्या पुढ्यात चहा नेत ती म्हणाली, “घी वायच.”
“नको बाय मला आय..... काय नको बाय.” सुजी म्हणाली.
“ये पोरी घी कि जरा, आस करत्यात व्हय? ताकत नको का यायला जरा कळा घालय?” शांताक्कान जबरदस्तीच ते टोपण सुजीच्या तोंडाला लावलं.
"तायसाब जरा फिरवा तिला हाताला धरून डेरी गेली कि परत माज दुध र्हाईल येतू जातु दुध घालून.”
"जा बाय, ये मगश्यान”
“व्हय व्हय यिन कि” म्हणत शांताक्का निघाली.
तेवढ्यात सिस्टर आल्याच. सुजी तशीच विव्हळत येझार्या घालत होती.
“काय मावशी नातीला काय खायला प्यायला दिलसा का? का आपल मोकळच येरझार्या घालतीया.” सिस्टरनी विचारलं.
“व्हय दिलाय कि जरा च्या.”
“रिपोर्ट काय हायत का मावशी तीचं? राक्तबिक्त तपासल्याल?”
“न्हायत वं कसलं रिपोर्ट.” सखुबाई बोलली.
“आस करत्यात व्हय मावशी परत काय झालं तर आमच्या नवान बोम्बलशीला कि.”
सखुबाई काहीच बोलली नाही. मुकाट्यान बसली.
“या हिकड पेशंटची माहिती द्या जरा.” सिस्टरन हुकुम सोडला.
सखुबाई जाऊन तिच्या शेजारी नुसतीच उभी राहिली. सिस्टरनी एक कागद काढला आणि एकेक रकाना भरू लागली.
“नावं काय पेशंटच?”
“सुजाता सुरज बनगर.”
“वय?”
“१७ वर्स.”
“काय १७ सांगताय काय वाटत का? येव्हड्या लहानपणी आत्ता बाळत व्हायचं व्हय तिनं? सिस्टरनी डोकं वर काढून तिच्याकड बघितलं. “आणा पेशंटला हिकड रक्त तपासुया.”
सखुबाईन सुजीच्या हाताला धरून आणलं. रक्त म्हणजे फक्त हिमोग्लोबिन तपासायची तेवढीच सोय त्या सरकारी दवाखान्यात होती. तेवढ तपासाल आणि राहिलेले रकाने तिने पूर्ण केले.
“चला मावशी पेशंटला आतल्या खोलीत झोपवा तपासुया.”
सखुबाई सुजीला घेऊन एका खोलीत गेली. आत नुसतच एक उंच बाकड आणि त्यावर चढायला छोटा स्टूल होता. सुजीला तिनं त्यावर झोपवलं.
सिस्टर आत आल्या आणि त्यांनी सखुबाईला बाहेर थांबायला सांगितलं. ती बाहेर गेली.
एकट्या सुजीला आत्ता थोडी भीती वाटत होती, एक तर कळा सुटलेल्या आणि कुणाचाच आपल्याकड लक्ष नाही, असं तिला वाटत होतं. सिस्टरने ब्लडप्रेशर तपासलं. एकदा दोनदा स्टेथस्कोप लावून नाडीचे ठोके तपासले.
“काय बिपिचा तेन कसला त्रास न्हाय न्हव?”
“न्हाई”
“कितवा महिना?”
“आठवा लागून तिन आठवडे झाल्यातं.”
“हं चल पाय वर कर, साडी वर घे.”
सुजीला कळेणा सिस्टर साडी कशाला वर करायला सांगते. ती तशीच पडून विव्हळत होती.
“ये बाय कळतंय का सांगीतल्यालं.” सिस्टरने आवाज वाढवला तसं सुजीनं थोड पाय वरती घेतले.
“अजून वर घे आवर लवकर, डॉक्टर येतील आत्ता. तपासून घेउदे मला. घे वरती अजून, अजून.”
ती सांगल तसं सुजीनं साडी वर घेतली आणि पाय वर केले.  सिस्टरने हातात ग्लोव्ज चढवले आणि ती पिशिवीच तोंड उघडल्याचा अंदाज घेऊ लागली. तिनं आत बोट घातलं तसं सुजी जोरात किंचाळली सुजीला ती कळ सहन झाली नाही.
“ये गप्प ओरडू नको ओरडायच नाही तसंच थोडा वेळ थांब. थांब कंबर उचलू नको झालं, झालं थांब.”
सिस्टरने बोट बाहेर घेतलं तसं सुजीनं श्वास सोडला. आता सिस्टर सुजीच पोट तपासू लागल्या. बाळाचे ठोके तपासले. सगळ काही निट असल्याची खात्री पटल्यावर त्या म्हणाल्या, “येतील आत्ता येव्हढ्यात डॉक्टर, तोवर कळ घाल.”
कळ घालायचं म्हणजे काय करायचं सुजीला कळेना. ती हळूच सिस्टरला म्हणाली, “माज्या आयला आत पाठवा कि.”
“काय करायची गं आय तुला मी हाय न्हव का हित?”
“आवो बोलवा कि आयला आत.” सुजीचा घसा कोरडा झालेला.
“ओ मावशी आत या पेशंट जवळ. कळा घालायला सांगा तिला.” सखुबाईला आवाज दिला आणि सिस्टर बाहेर गेल्या.
सखुबाई सुजीला कळ कशी घालायची ते सांगू लागली.
एवढ्यात डॉक्टर आलेच. आत्तापर्यंत बर्याच पेशंटची रांग लागली होती. आपल्या केबिन मध्ये गडबडीने जात त्यांनी सिस्टरला आवाज दिला.
“सावंत मॅडम....!”
डॉक्टरनी आवाज दिल्याबरोबर अगदी तत्परतेन सिस्टर आत गेल्या.
“सगळ्या पेशंटचे केसपेपर करून झाले असतील तर एकेक आत पाठवा.”
“नाही सर, सकाळ पासून डिलिव्हरीसाठी एक पेशंट आलंय, अजून कुणाचे केसपेपर केले नाहीत एकेक करून आत पाठवते...”
“बर बर आवरा लवकर’’
सगळे पेशंट पटापटा तपासून झाल्यावर डॉक्टर सुजीला तपासायला निघाले. सिस्टर सगळे इनस्ट्रूमेंट रेडी आहेत न? “
“ हो आता करते.....” सिस्टर कचरत बोलली.”आत्ता करणार मग आल्यापासून काय केलं? पेशंटचे रेपोर्ट नॉर्मल आहेत न?”
“त्यांचे कसलेच रिपोर्ट  न्हाईत, ब्लड आत्ता चेक केलं कमी आहे, वजन कमी आहे आणि ठोके पण मघाशी थोडे वाढले होतं आणि दिवसपण पूर्ण भरलेल न्हाईत.”
हाताच्या बाह्या दुमडत डॉक्टर सुजीजवळ आले. त्यांनी पण आधी पोट तपासलं, बिपी तपासाला, ग्लोव्हज चढवले, आणि सिस्टरनी तपासलं त्याच पद्धतीन त्यांनीही तपासलं. पिशिवीच तोंड थोड उघडलं होतं.
“सिस्टर, बिपी मघापेक्षा वाढलाय, ठोके पण वाढल्यात, रक्त आणि वजन तर खूपच कमी हाय. पेशंटला इथ ठेवण धोक्याचं हाय, ताबडतोब गाडी घ्या आणि जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात न्या, तुम्हीपण सोबत जावा. गाडीत गरजेचं सगळ समान घ्या", त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.
सखुबाई आत्ता घाबरली, सोबत कुणीच न्हवत, सुजीच्या नवर्याला पण कळवल न्हवतं, काय कराव तिला प्रश्न पडला.
“मावशी आत्ता काय विचार करत बसू नका. चला तिथ गेल्यावर यील कळवायला.”
सुजी, सखुबाई, ती सिस्टर आणि गाडीचा ड्रायव्हर असे चौघ जण निघाले जिल्ह्याच्या दवाखान्याकड. सुजी आत्ता पुरती घाबरलेली, “आय कस व्हायचं ग आय.... आय यास्नी तरी सांगायचं नाही काय परत वरडतील.”
“ये बाई गप्प आत्ता कसलं टेन्शन घेऊ नको, काय नाही होत, होतंय सगळ व्यवस्थित. कशाला ओरडतोय तो आम्ही सांगतो कि तेला कशी झाली  परिस्थिती, आत्ता गप्प रहा उगाच जास्त बोलू नको, जास्त विचार करू नको.”
सिस्टर, सखुबाई आणि सुजीची समजूत घालत होत्या.
एक तासाचं अंतर पार करून गाडी जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्याबाहेर थांबली. सुजीला पटकन डिलिव्हरीवॉर्ड मध्ये नेलं.
तिथल्या सिस्टरनी देखील तिला परत तपासलं. डॉक्टर रेपोर्ट मागत होते, पण त्यांच्याजवळ कसलेच रिपोर्ट न्हवते. रिपोर्ट आल्याशिवाय डॉक्टर पुढचे उपचार तरी कसे करणार?
“काय मावशी आसच उठून येताय परत काय कमी जास्त झालं कि आमच्या नावानं बोम्बलताय. एक रिपोर्ट नाही तुमच्याकडं, काय करायचं आम्ही?” तिथल्या सिस्टरनं सखुबाईला चांगलंच झापलं.
सखुबाई गप्प बसली, काय करावं सुचत न्हवतं. डॉक्टरनी  सिस्टरना आधी पेशंटचे रक्त आणि इतर तपासण्या करून घ्यायला सांगितलं.
“सगळे रेपोर्ट यिसपातुर  एक दोन तास तरी लागणार बघा मावशी,” सोबत आलेली सिस्टर बोलली.
“तुमच्याकडं घरातला कुणाचा नंबर आसल तर सांगा, फोन करून बोलवून घीवूया..”
व्हय तेवढं तिच्या नवर्याला कळवा, नंबर देतु, या दवाखान्यात मला काय सुदरायाच नाय.” सखुबाईचा आवाज कापरा झालेला. तिनं कमरेला खोचलेली एक प्लास्टिकची पिशवी काढली त्यातून एक कोपरे झिजून गेलेली, तरी जीवापाड जपलेली छोटी डायरी काढली. त्यात तिच्या बर्याच पै-पाहुण्यांचे फोन नंबर होते. ती डायरी त्या सिस्टर समोर धरून ती म्हणाली, “हे घ्या यात सुरज बनगर नंबर अासलं बगा, त्यावर फोन लाऊन द्या मी बोलतु”, त्या सिस्टरने डायरीतून सूरजचा म्हणेज सुजीच्या नवर्याचा नंबर शोधला आणि फोन लाऊन तिच्याकडं दिला.
सुरज बारावीपर्यंत शिकलेला. कुठ मिळेल ते काम करायचा. काहीच नाही मिळालं तर उसाच्या तोडीत जायचा. आज पण तो असाच तोडीवर गेलेला, काही दिवसांपूर्वीच तो सुजीला भेटून गेलेला. नववा महिना लागायला अजून उशीर होता, म्हणून तो निश्चिंत होता. सखुबाईचा फोन गेल्यावर तो जरा काळजीतच पडला. "आत्ता.... बर बघतो कस जमतंय," म्हणत त्यानं फोन ठेवला.
“मावशी रिपोर्ट आल्यात बघा पेशंटच, रक्त कमी हाय आणि तिचा बिपी वाढलाय आम्ही प्रयत्न करतोय बिपी नॉर्मल करायचा पन बहुतेक सीझर करायला लागलं. म्हणून कुणाला तरी बोलवून घ्या पटकन.
“व्हय सांगितलंय बाय तिच्या नवर्याला फोन करून. यील कि आत्ता.”
“अवो मावशी ऑपरेशन करायचं म्हंजे, कुणीतरी कागदपत्रावर सही करायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही ऑपरेशन काय करणार तुम्ही सांगा?”
“ आग बाय मला सही येत नाय, अंगठा केला तर चालल का?” सखुबाईन विचारलं.
“हं चालतंय कि, तुमी कोण लागता पेशंटच?”
“मी आजी हाय तिची”
“बर करा अंगठा हितं खुणा केलेल्या जाग्यावर.”
तिनं दाखवलेल्या ठिकाणी सखुबाईन अंगठा उठवला.
सुजीला त्या सिस्टरनी चालवतच वरच्या मजल्यावर नेलं, ऑपरेशन थीएटर बाहेर एका छोट्या रूम मध्ये तिला कपडे काढायला सांगून गाऊन चढवला. त्या आधी दवाखान्यातल्या शिकाऊ सिस्टर पोरींनी तिचं ओटीपोट ब्लेडने स्वच्छ केलेलं, तिला कॅथेटर लावलेला. सुजी त्या पूर्ण परक्या माणसांच्या गराड्यात एकटी गोंधळून गेलेली, आई कुठ हाय अस विचारण्याची तिला तीव्र इच्छा झालेली पण तो माहोल पाहून ती गप्पच राहिली.
“ये चल झोप इथं”
एका उंच टेबलावर तिला झोपायचं होत ज्यावर झोपताना पाय पसरावे लागायचे.
“ये बाई आवर कि लवकर,” असं म्हणत एक म्हातार्या माणसान तिला हाताला धरून वर ढकलली. सगळ्या लोकांनी तिच्यासारखेच हिरव्या रंगाचे गाऊन घातले होते आणि तोंडाला पांढरे मास्क बांधले होते. ती गप्प पडून राहिली.
काय झालं तिला कळत न्हवतं, पण काहीवेळा पूर्वी तिला जितक्या तिव्रतेन कळा येत होत्या तितक्या तीव्रतेन कळा येण कमी झालं होतं.
“ये चल उठून बस”
ती उठून बसली ,
“पाय दुमडून पोटाजवळ घे आणि एकदम खाली वाकायचं हं”, तिनं ते डॉक्टर सांगतील तसं ऐकलं.
“वाक अजून,.... वाक”
तने पूर्ण गुढघ्यात मान खुपसली आत्ता तिच्या मणक्याला ओढ लागली,
“ थांब हं तशीच अजिबात हलायचं नाही”,
तशा अवस्थेत फार काळ थांबणं शक्य नव्ह्तच ती वाकली तशी पाठीमागून डॉक्टरांनी तिच्या मणक्यात बारीक सुई खुपसली, ते तिला सांगत राहिले “जोरात श्वास घे,” तिनं श्वास घेतला,
मग झटक्यात इंजेक्शन देऊन डॉक्टरांनी तिला झोपायला सांगितलं.
बाहेर सखुबाई एकटीच उभी होती. सुजीची तिला खूपच काळजी वाटत होती. सुजी जन्मल्यापासून तिच्याच सवयीची होती, तिची आई होती तेंव्हा पण ती आपल्या आईपेक्षा सखुबाईजवळच जास्त रहायची. सुजीचा बाप दारुडा. तिची आई मनीषा त्याच्याजवळ राहिलीच नाही, सुजीच्या वेळला डिलिव्हरीसाठी म्हणून आली ते परत नांदायला गेलीच नाही. त्यानंही परत तिला बोलवली नाही. सखुबाईच्या जन्माची पण तिचं तऱ्हा, दोन मुलं झाल्यावर ती पण, माहेरातच राहिलेली. मनीषा आणि ती दोघी मिळून कामावर जायच्या. घरी सखुबाईचे आईबाप सुजीला सांभाळायचे. अचानक एक दिवस मनीचा नवरा आला आणि मी माझ्या बायको आणि पोरीला घेऊन जाणार म्हणाला. सखुबाई आणि तिचे आई बाप त्याला अडवू शकले नाहीत. मनीषाची अजिबा इच्छा न्हवती त्या राक्षसासोबत जायची, सुजी तर त्याला पहिल्यांदाच बघत होती. तिला पण आपल्या सखू आईला सोडून कुठंच जायचं न्हवतं पण त्यानं कुणाचं ऐकलं नाही. काही दिवस मनीषा त्याच्या सोबत राहिली. काहीदिवसांनी तो एकट्या सुजीला तेवढी घेऊन परत सखुबाईकडं आला, “त्या रांडन मला फसवलं, उंडगायची सवय लागलेली कुत्रीला गेली कुठ त्वांड काळ करून,”
“आर पर कुटं गेली?”
“सखुबाईच्या म्हातार्या बापानं विचारलं.
“न्हाय म्हाईत मला कुठ गेली कुत्री कुणास ठाव, हि बी कुत्री सांभाळा तुम्हीच”, म्हणून तो सुजीला तिथ सोडून गेलेला.
छोटी सुजी सांगत होती, “ह्यो माणूस आयला लय मारायचा, मला बी मारायचा, परवा हेच्यासंगच भांडत भांडत आय बाहेर गेली आन ह्यो एकटाच मागं आला, आय हेच्या बरुबरच गेल्ती.”
मनीषाचं काय झालं? ती कुठ गेली, हे नंतर कुणालाच कळालं नाही. सखुबाईनच सुजीला सांभाळलं, तिला पदर आल्यावर तिचं लग्न लाऊन  दिल. सुजीला तिच्या नशिबानं चांगला नवरा मिळालेला. चांगला म्हणजे निर्व्यसनी... एवढीच त्यांची माफक अपेक्षा.
थोड्याच वेळात सुरज दवाखान्यात आला.
“आज्जी सुजी कुठं हाय? काय झालय तिला?” त्यानं सखुबाईला विचारलं.
सखुबाईनं सकाळपासूनची सगळी हकीकत त्याला सांगितली,
“काय न्हाय बगा पावनं सुजी आत्ता मोकळी हुईल बगा, डॉक्टरनी मला सांगितलंय सगळ वेवस्थित हुईल म्हून.”
सुरजला धीर यावा म्हणून सखुबाई बोलली खरं तिच्याच काळजाचा ठोका अधूनमधून चुकायचा. जीव घाबराघुबरा व्हायचा.
बाळाला बाहेर काढलं आणि डॉक्टरांनी सुजीला टाके घातले, तिला ऑक्सिजन लावलेला, बाळ अजूनही रडलं न्हवतं. डॉक्टरांनी बाळाला चिमटे काढले, त्याला उलट केल तरी बाळाचा आवाज फुटत न्हवता, सिस्टरनी त्याला एका कपड्यात गुंडाळले. डॉक्टरांनी त्याचे ठोके तपासले पण काही उपयोग न्हवता.
“इट इज डेड.” डॉक्टर बोलले.
सिस्टरने त्या बाळाला सखुबाईच्या हातात आणून दिलं आणि म्हणाली,
“हे घ्या मावशी, बाळ आतच मेलेलं”
हातातल्या त्या बाळाकडे पाहून सखुबाईने हंबरडा फोडला.
तिचा हंबरडा ऐकून सुरज पळतच जवळ आला. तिनं ते बाळ त्याच्या हातात दिलं आणि ती मटकन खाली बसली.
एव्हढ्यात स्ट्रेचरवरून सुजीला बाहेर आणलं. तिच्या जीवाला अजूनही धोका होता.
स्ट्रेचर वरून तिला आयसीयू मध्ये ठेवलं.
सुरज ते निर्जीव बाळ हातात घेऊन तितक्याच निर्जीवपणे काचेतून पलीकडे झोपलेल्या सुजीकडं पाहत राहिला.


मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

Post a Comment

0 Comments