भाक


         गणपती आल्यात. जरा शेणकाला घ्यावा घरातनं ,  म्हणून सुमी श्यान आणाय गेली. वाटंत तिला खाड्यांची म्हातारी भेटली. 

तिन इचारलं ,  “कुटं चाललीस गं सुमे?”
 हिनं सांगितलं, “शेडतनं म्हशीचं श्यान घिवून येतू .”
“आगं ,  मग आज कशाला आणतीस श्यान ? 
गवरी तीन दिसानं येत्यात, उद्याच्याला काड सारवून.” म्हातारीनं सल्ला दिला.
“आसं म्हणतायसा काय आत्ती ?  बरं . मग उद्याच नेतु.” , असं म्हणून सुमी मागं फिरली. 
घरात आल्यावर थोरल्या जावंनं इचारलं, “का गं रिकामीच आलीस ?”
“आवं बाईसाब,  ती खाड्याची म्हातारी म्हणाली, आज नगं  काला वडुस, तीन  दिसानं गवरी येत्यात. म्हणून आलु तसीच माघारी.” 
“बरं झालं . राहुदि की मग. उद्या कराय यिल सारवाण.”

          सुमीच्या नवऱ्याला सतत दुखणं मागं लागल्यालं.  तिची पोरं रिकामटेकडी. काम नाही ! 
 दोघां नवरा बायकोनं कामावर जावं ,  तवा चुल पेटती सुमीच्या घरात  !  

       खरं तर पूर्वी सुमीच्या घरी हे असलं देव नव्हतंत. सुमी आता कुठं प्रवचन, कीर्तन ऐकाय जाती . तवापास्न तिची देवाधर्मावरची श्रद्धा वाढली. मग ती घरातल्या चांगल्या कामाला चांगला दिवस बघायची.   दिवस चांगला नाय आसं देवरुषानं सांगितलं ,  तर ते काम पुढं ढकलायची.

 '' पोरांना काम नाय.एवडी शिकल्यात, काय करावं ?''  सुमीनं इचारलं .  
देवरुशी म्हणाला, '' पिढ्यानपिढ्या कवा द्यावधरम केल्यालं नाहीत. आता तुमी तर करा."

       मग जमंल तसं तिनं एकेक सणवार सुरू केलं. तरीपण घरातलं दुखनंभानं  हटंना. परत देवरुश्याकड गेली. 

त्यानं विचारलं , “तुमच्या लग्नाला किती वर्स झाली?”
ती म्हणाली," तीस वर्स.”
“जागराण घातल्यालं काय ? ” ,देवरुशी.
“लग्नातंच घातल्यालं . तवापास्न नाय.” सुमी.
“ कुळदैवताला जागरणाचाच मान हाय. तेचा रोष हाय. जागरण घातल्याशिवाय घरात धानधन वाढणार नाय " , देवऋषी म्हणाला.

          जागरण घालणं काय खायची गोष्ट नव्हती. पंधरा-वीस हजाराला गाठ होती, आतापर्यंत देवरुशी
 जे जे सांगल ते ते  ती आपली एकटीच कशीबशी निभावून नेत होती. 
पण हे काय तिच्या एकटीनं रेटणारं नव्हतं.
तिची काळजी वाढली. तिनं आपल्या मनातलं बहिणीजवळ बोलून दावलं, 
बहिणीच्या सासूच्या अंगात शिवकळा यायची. शिवकळा घेवून सासूनं भाक बांधून दिली. एक नारळ आणायला सांगितला. 
आयत्या येळंला नारळ कुटला? बहिनीनं घरातलाच नारळ दिला. 
त्या नारळाबरुबर एक लिंबू .तो पण  बहिणीच्याच घरातला !  
त्याला काळं पांढरं लावलं.

 तो नारळ लिंबू एका पांढऱ्या  फडक्यात गुंडाळला आन्  सांगितलं, " हे घरात जपून ठीव. जवा तुज्या बाळाला नोकरी लागंल , तवा जागराण घालतो,  अशी शपथ घे . घरातल्या देवासमोर तवर तुझी राखाण ठिव म्हणावं.  हेनं फरक पडंल. पंदरा दिसांत गुण यील."

          बहिणीनं नारळाचं, लिंबाचं, कपड्याचं पैसं बाजारभावानं घितलं.  
म्हणाली, “येवड्यानं काय मी मोटी व्हत नाय ,
पर देवाला आसं मान्य व्हायचं नाय,  म्हुन पैसं घितु.”

       आता सुमीचा जीव भांड्यात पडला.  तिला वाटलं आता नक्की फरक पडंल. 

       पंधरा दिवस गेलं.  तरी तिला काही फरक जाणवला नाही. ती परत बहिणीकडं गेली. 

आता शिवकळा म्हणाली, “दिल्याली भाक तु घराच्या खालच्या दिशेला बांदलीस म्हुन ती देवाला मान्य नाय. पंदरा दिवसाआदी तू भाहीरची झालतीस . शिवाशिव झालीया, नवी भाक बांधाय पायजे.”

      परत सगळ्या वस्तू नव्यानं घेतल्या, भाक बांधून दिली.
आता शिवकळा म्हणाली, “माज्या देवाम्होरं फुल ना फुलाची पाकळी ठेवली पायजेस.  तुजं नशीब आता उघडायला आलंय, पैशाच्या राशीत आता लोळणार हाइस, देवाची तुज्याकडनं सेवा करवून घ्यायची इच्छा हाय. लय नको. नुस्तं शे-दोनशे देवाफुडं ठिव.”

   आता सुमीची चांगलीच पंचाइत झाली. बहिणीकडं जायाचं म्हणून तिनं  दोन दिवसांचा रोजगार आगाऊ घेतल्याला !  त्यात पावसापाण्याचं दिवस.  घरातलं धान्यधुन्य पण संपत आल्यालं.  
हाईत ते शे-दोनशे रुपये पण देवासमोर ठिवलं तर खायाचं  काय? असा प्रश्न तिला पडला .

         पण  आता देवाचीच इच्छा हाय म्हणल्यावर तिचा नाईलाज होता.

         पदरात बांधल्याली भाक घिवून ती घरात आली.  आता काळजीपूर्वक तिनं ती भाक योग्य दिशेला बांधली.  शिवाशिव बी व्हणार नाय,  याची काळजी घेतली.

     दुसऱ्या  दिवशी आभाळ भरुन आलं, धो-धो  पाऊस  सुरू झाला, म्हसरास्नी वैरणकाडी आणणं गरजेचं हुतं.  दोघं नवरा बायको उठून रानात गेलीत. पाऊस  काय थांबण्याचं  चिन्हं नव्हतं. उभ्या पावसात दोघांनी वैरण काडून भारा बांधला आणि माघारी आलीत. 

          सुमीचा नवरा आदीच दारुनं खंगल्याला. सारखा आजारी.  सुमीनं आदी त्याला बदलायला कापडं दिली. चुल पेटवून जाळ केला. गरम चहा बनवला. त्याला जरा उबारा वाटला. सुमीनं आपली कापड बदलली. ती  जेवणाला लागली. बाहेरच्या सोप्यात  नवरा बसल्याला. ही आत चुलीजवळ भाकरी करत होती. भाकऱ्या   झाल्यावर तिनं नवऱ्याला हाक मारली. त्याला झोप लागलेली. 
         
         ती चुलीजवळनं बाहेर आली. त्याला हाक दिली. तो हुं का चूं  करीना. जवळ जाऊन हलवू लागली.  अंगाला हात लावल्यावर तेला ताप आल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं कसंबसं त्याला उठवून बसवलं. त्यो उठला. 
म्हणाला ,  “अगं सुमे ,  आंग सगळं ठणाकतय बग. ”
“व्हय ताप हाय तुमाला, जरा जेवा.  मग जावूया दवाखान्यात.” ती म्हणाली.

         दोघांनी जेवण आटोपलं आणि ते दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी औषधं , इंजेक्शन दिलं.
चार दिवस सरलं ,  तरी तेचा ताप काही कमी नव्हता. वर हातातल्या कामाला काय सुट्टी न्हाय.  सुमीबरुबर तेला वैरणीला जावंच लागायचं.

       आठ दिवस गेलंत तरी काय कमी नाय, ताप कमीजास्त व्हायचा. अंग ठणकायला लागलं की, दारु बिगर जमायचं न्हाय.  शेवटी सुमीला धीर धरवंना. 

       ती म्हणाली, “चला . जाऊया परत दवाखान्यात, काय झालं कमी जास्ती,  तर कोण हाय का बगायला?”
      
      खरंच होतं तिचं!
      परत दोघं दवाखान्यात गेले.  डॉक्टरनी रक्ताच्या तपासण्या कराय सांगितल्या. 
“ सुमे , राहु दे ते रगातबिगात तपासायचं.  नुसतं औषध घिवुया” नवरा बोलला.

  ती म्हणाली, “असं कसं ?  डॉक्टर त्याबिगर औषिद देणार नायतं.” 

मग दोघांनी जावून  रगात तपासाय दिलं. तपासणीवाल्यानं दुसऱ्या  दिवशी सकाळी येवून  रिपोर्ट न्यायला सांगितलं. त्या रिपोर्टावारीच शे पाचशे गेलं.

       रातभर ताप कमी नव्हता. सुमीला चैन पडंना. सकाळी लवकर उठून तिनं तेला खायला घातलं आन्  एकटीनंच जावून वैरण आणली. परत आल्यावर सगळी कामं आवरली.  तेला घिवून दवाखान्यात गेली.

         “रिपोर्टमध्ये फार काही दोष नाही,  पण रक्त कमी झालंय आणि पेशी वाढल्यात ! ” डॉक्टरनी सांगितलं . त्यासाठी औषधं दिली आन्  परत इंजेक्शन ! 
औषध घिल तसा हळूहळू तेचा ताप कमी आला. तो आता जरा बरा झाला.

           ती म्हणाली, “मी आक्काच्या सासूकडनं भाक बांदून आणल्याली.  पण  तेचा काय फरक जाणवंना.”
“असा फरक पडतो व्हय गं ? ” त्यो बोलला, “जे व्हायचं ते  व्हतं.  अशानं फरक पडला आसता म्हंजी सगळीच सुखी झाली असती .”
“तसं कसं ?  शेवटी नशीब बी आसतं एकेकाचं ! ” ती म्हणाली.
“ तसं नसतं बाय.  ही देवदेवस्की सगळी झूट आसती. आपल्याव पयला आपला भरोसा पायजे. 
 कुटलं द्याव आन् कुटलं धरम ?
 देवबी चोरालाच सामील आसतो .”
“आसं कस बोलतासा ? ”

“त्यो गण्या वाणी बग. आमी ल्हान असताना  एक खोकं हुतं नुस्त त्याचं !  
आन् तेची आय! ती म्हातारी गोळ्या बिस्कीटं ईकत बसायची. आत्ता किती फरक पडलाय. तीन मजली घर, गावात तेचीच दोन दुकानं झाल्यात.”

“बगा की .  खऱ्याचं खोटं करणाऱ्याच्याचं मागं कसा ऊभा -हाईत आसंल देवपण ?   रेशनचं तांदुळ तेनं माज्याकडनं  १० रु. किलोनं  घेतलं .  आन् तेचं आता ईस रुपयानं इकणार ! ” ती सहजपणे बोलली.

          मग ?  आसंच आस्तंय. 
 मोठी व्हणारी आशीच मोठी व्हत्यात. त्या रोड्याच्या आबानं कवा तर आमच्या तात्याच्या हातात दहा रुपय दिलं आसतील. आता तो मला म्हणाला, " माज्याकडनं तुज्या बानं  पन्नास रुपय घेतल्यालं उसनं,  आता गरज पडली मला. आणून दे आठवड्यात. " 
मी  बरं म्हंटलं. 

" पिढीजीत सावकारीचं केली तेनं .  मग मोटा हुयाचा राहील का?” तो म्हणाला.
“खरं हाय .” सुमी म्हणाली.

         बराच वेळ ते आसं बोलत राहिले. बोलत बोलतच दोघांना कधी झोप लागली कळालं नाही. झोपेत सुमीला सपान पडलं, ती आक्काच्या सासूला जाब इचारत होती, “बग . तू  भाक बांदून दिल्याली... तरीबी मला काडीचा फरक पडला नाय.  सांग मला गुण का नाय देवाचा ? ” 

आक्काच्या सासूच्या तोंडातनं येकबी सबूद निगत नव्हता. 
“ सांग ?  मी काय घोडं मारलं तेचं ? का नाय तेचं डोळं उघडंत ? 

दवाखान्यासाठी मी महिन्याचं राशन घातलं. 
सांग देवानं का नाय बरं केलं? स्वप्नातच ती देवाशी आन्   त्या भगतीनीशी जोरजोरात भांडत होती. 

ना देवानं तिला उत्तर दिलं ना त्या देवरुशनीनं ! 

© मेघश्री श्रेष्ठी.

Comments

Unknown said…
खरच खुपच छान
अतिशय छान आहे ...

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing