मातृत्व

आज आईचा दिवस. Mother's Day. आई काय असते हे ती आपल्या आयुष्यात "असते" तोपर्यंत कळत नाही. असे जोशाने दिवस-बिवस साजरे करून आपण आपली जबाबदारी झटकतोय की आधीच जबाबदारीने वाकलेल्या तिच्या खांद्यावर अजून भार लादतोय याचा विचार होणं गरजेचं आहे. खरं तर प्रत्येक नात्याचं वय हे त्यातील गरजेवर अवलंबून असतं. गरज , स्वार्थ , ओलावा संपत आला की नाती मरायला टेकतात , पण मरत नाहीत. आपण मानुष्यप्राणी आपल्या गरजांसाठी नात्यांचं चित्र विचित्र जाळं विणतो. या जाळ्यात सर्वात जास्त गुरफटून जाते ती बाई. आईपण समजून घेण्याऐवजी त्याचं उदात्तीकरण करण्यात आपण मानलेली धन्यता कोत्यावृत्तीचं द्योतक आहे. आपण आईपणाचा उत्सव करू पाहतोय पण आईपण वाटून घेऊ पहात नाही. आई होणं ही फार व्यापक आणि सुंदर गोष्ट आहे. पण , आपण ही संकल्पना फक्त योनी , गर्भाशय आणि त्या गर्भाशयाची उत्पादकता एवढ्या त्रिसुत्रीत बंदिस्त केली. जी बाई मुल जन्माला घालू शकते तीच आई होऊ शकते आणि त्यातही जर तीने पुरूष जन्माला घातला तर ती सन्माननीय असते. मनुस्मृतीनं सांगून ठेवलंय , ' मुलगी झाली आणि कुणी विचारलंच काय झालं ? तर , काहीही झालं नाह...