कर्पूरगौरं करुणावतारं!
“त्राही माम, त्राही माम,” करत राक्षसांच्या त्रासापासून बचावासाठी पळ काढणारे देवगण, हातात चिपळ्या घेऊन ‘नारायण, नारायण’ बोलणारे पण इकडचे तिकडे नि तिकडचे इकडे करून लावालावी करण्यातच धन्यता मानणारे नारदमुनी, शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले आणि देवी लक्ष्मीकडून सेवा करवून घेणारे भगवान विष्णू, कमळात विराजमान झालेले त्रिमुखी ब्रह्म, या सर्वांपेक्षा अंगाला भस्म फासलेला, विष प्यायल्याने नीलकंठ ठरलेला, गळ्यात साप आणि डोक्यावर गंगेचा भार वाहणारा, भोळा सांब सदाशिव मला जास्त प्रिय आहे. कृष्णाची राधा होण्याची कल्पना मला कधीच भावली नाही. पण, शिवाची पार्वती होण्याचा रोमँटिसिझम मला जास्त भावतो. म्हणून माझा पहिला क्रश आहे तो महाशिव! सृष्टीचा तारणहार! गुगलवरून साभार सांसारिक जीवनाचा पाया रचणारे शिव पार्वती हे पहिले दाम्पत्य मानले जाते. इतर देव आणि देव पत्न्या यांच्यापेक्षा शिव-पर्वतीची प्रेमकहाणी खूपच हटके आहे. शिवाचे सतीवरील प्रेम, तिच्या हट्टा पुढे विरघळणारे त्याचे कोमल हृदय आणि तिच्या विरहाने तापदग्ध झालेला तांडव करण्यास उद्युक्त झालेला शिव. शिवाची ही सगळी रूपे विलोभनीय वाटतात. ...