मी चुकते...
अंगात ताप थंडी असतानाही, मी भिजवते बदली भर कपडे, काढत राहते मळ, हात दुखेपर्यंत, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. पायात गोळे येतात, पाठ ताठते उभी राहून, तरी भाजते भाकर्या, शिजवते डाळ-भात, पोटात ठरत नाही अन्नाचा कण तरी, विचार करते, मी नाही केलं तर, उपाशी राहतील लेकरं, दिवसभर थकलेल्या तुला काही झालं तरी मिळायलाच हवेत दोन मायेचे घास, म्हणून रांधत राहते पुन्हा तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. तो रडू नये, तुला होऊ नये त्रास त्याच्या आवाजाचा, म्हणून मांडीवरच घेऊन त्याला, अवघडून बसते रात्रभर, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. तुला जायचं असतं ऑफिसला, तेंव्हा तुझ्या आधी उठून, आवरते डबा आणि तुझा नाष्टा, मात्र तुझ्या आधी, घासही घालत नाही तोंडात, तेंव्हा म्हणत नाहीस तू चुकतेस. तुझे नातेवाईक येणार म्हणून, कुठे जयाचय समारंभाला, तुझ्यासोबत म्हणून, मी रजा टाकते, एक दिवस कामाला बुट्टी मारून, मिरवते तुझ्यासोबतच सहअस्तित्व, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस....