"उदास निळे डोळे"
उदास निळे डोळे दुपारच्या वेळेत मी बाळाला घेऊन पडले होते. इतक्यात दारावर टकटक झाली...... दुपारचे दिड वाजलेले म्हणजे नक्की हेच असणार...... मी उठले. दरवाजा उघडला. दारात हेच होते ..... पण एकटे नाही..... !! त्यांच्या मागे एक विशीच्या आसपासची, काळी सावळी, टपोर्या डोळ्यांची चुणचुणीत तरुण मुलगी उभी होती. मी तिच्याकडे पाहून हसले, तीही अगदी माफक हसली. आत आल्यावर ह्यांनी ओळख करून दिली. "ही आरती, कॉलेजच्या अॅडमिशनसाठी आले, नंदुरबारवरून." "हो का... येना..... आरती....!! त्या दोघांच आटपेपर्यंत मी ताटं वाढली. आम्ही जेवायला बसलो, “इतक्या दुरून इकडे आलीस कॉलेजसाठी, तुमच्याकडे नाही का कॉलेजची सोय?” तीनं नुस्तच एकदा माझ्याकडे पाहिलं, परत ह्यांच्याकडे पाहिलं. “मग हेच बोलले आदिवासी मुलांसाठी इथे शासकीय वसतिगृहाची सोय आहे. त्या मुलांना उच्चशिक्षणासाठी इथेच यावं लागतं.” “ अवघडच आहे की, इकडे एवढ्या लांब काय गरज हॉस्टेलची?” “सरकारी योजना काय करणार?” हे म्हणाले, आरती अजिबात बोलत नव्हती. मी तिला काही विचारलं तरी ती ह्य...