Posts

मालकी हक्क

तू नको म्हणत असतानाही, मी तोच फोटो ठेवला माझ्या डीपीवर आत्ता.... कमेंट आले माझ्या प्रोपिकवर 'व्हेरी हॉट...!!!' बघ ना... अगदी मला बहिणीप्रमाणे मानणाऱ्या मला भावाप्रमाणे असणाऱ्या, मानलेल्या भावानेही तिचं कमेंट दिली. तुझ्या एखाद्याही पिक वर येत नसेल ना अशी कमेंट? कशी येईल! तुझ्या लिस्टमधल्या बायकांची नजर अजून तयार झाली नसेल, पुरुष नावाच्या वस्तूकडे पाहण्याची... किंवा झाली असेल तरी.... त्यांना अडवत असतील, त्यांच्या संस्कारांचे उंबरठे. बघ माझ्या मित्र यादीतले कित्येक मित्र, मला ओळखतही नाहीत, तरी मी त्यांच्यासाठी असते डीअर, हॉट आणि सेक्सी. ऐक ना, मलाही वाटतं, तुझ्याही प्रो-पिकला,   कुणी तरी म्हणावं सेक्सी आणि हॅंडसम.... माझ्याशिवायही तू असावास कुणाचा तरी क्रश. म्हणजे बघ ना तू आवडणारा, मी एकटीच कशी असू शकेन? इतरही कुणी असेल जिला तू आवडत असशील..... म्हणजे माझ्या डीपीवर कसे बिनधास्त रिअॅक्ट होतात... तसच व्हावं कुणी, तुझ्याही डीपीवर रिअॅक्ट......

मी चुकते...

अंगात ताप थंडी असतानाही, मी भिजवते बदली भर कपडे, काढत राहते मळ, हात दुखेपर्यंत, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. पायात गोळे येतात, पाठ ताठते उभी राहून, तरी भाजते भाकर्या, शिजवते डाळ-भात, पोटात ठरत नाही अन्नाचा कण तरी, विचार करते, मी नाही केलं तर, उपाशी राहतील लेकरं, दिवसभर थकलेल्या तुला काही झालं तरी मिळायलाच हवेत दोन मायेचे घास, म्हणून रांधत राहते पुन्हा तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. तो रडू नये, तुला होऊ नये   त्रास त्याच्या आवाजाचा, म्हणून मांडीवरच घेऊन त्याला, अवघडून बसते रात्रभर, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. तुला जायचं असतं ऑफिसला, तेंव्हा तुझ्या आधी उठून, आवरते डबा आणि तुझा नाष्टा, मात्र तुझ्या आधी, घासही घालत नाही तोंडात, तेंव्हा म्हणत नाहीस तू चुकतेस. तुझे नातेवाईक येणार म्हणून, कुठे जयाचय समारंभाला, तुझ्यासोबत म्हणून, मी रजा टाकते, एक दिवस कामाला बुट्टी मारून, मिरवते तुझ्यासोबतच सहअस्तित्व, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस....

मी कोण?

मी खूप सभ्य आहे, असं ते म्हणतात... मी फारच शांत आहे, असंही तेच म्हणतात... मी कधीच वागत नाही, अल्लड, अवखळ... हे सुद्धा तेच म्हणतात, मी सोशिक, समंजस आहे म्हणे, असं ते म्हणतात... मी सात्विक, सुशील आहे म्हणे, असं ते म्हणतात... मी घराची मर्यादा आहे म्हणे, असं ते म्हणतात... मी संस्काराची शिदोरी आहे, असं ते म्हणतात... मी गुणवान आहे, रूपवान आहे, भाग्यवान आहे, असंही तेच म्हणतात... माझ्या निरुपद्रवी व्यवहाराचा, खरा मुखवटा त्यांनी ओळखला नाही अजून, ते ओळखतात जिला, ती मी न्हवेच... त्यांना नाही माहित, माझ्या मानसिक स्वांतत्र्यावर, भावनिक आवेगावर, बौद्धिक अस्तित्वावर सतत ... चढणाऱ्यांच्या बुडाखाली स्फोट करण्यासाठी... दारुगोळा जमा करणारी, मीही एक 'फुलन' आहे. © मेघश्री श्रेष्ठी-नाईक.