वळण

त्या तिथे भांड्यांचा ढीग पडलाय , जो स्वत:हून हलणार नाही. तिथे कपड्यांचा , तिथे बारीक धूळ , कुठे केस , कुठे कपटा.... कहीच नाही हलू शकत जागचं , स्वत:हून. .... आणि इथे मी! हलायचंच नाहीये काही करून , असं ठरवलं नाही. पण , तसंच झालंय खरं! " माणूस " होतो का आपण कधीकाळी ? हे सांगता नाही येणार... पण , काहीतरी होतो आपण कधीकाळी जे आता नाहीहोत आणि जे आता आहोत ते नव्हतोच कधीकाळी! सांग ना , आतल्या जीवनरसाला वाळवी कधी लागत गेली , हे कळलं कसं नाही तुला ? आयुष्यातली सांज हळूहळू गडद अंधाराकडे झुकत चालले.... आणि याचा तुला पुसटसाही अंदाज आला नाही ? आता या क्षणीतरी तुला वाटतंय का , आपण ठरवलं तर... तर पुन्हा पहाट होण्याची शक्यता वाढू शकते ? सुकलेल्या मुळांना पुन्हा पालवी फुटू शकते ? ही वाळवी पुन्हा नष्ट होऊ शकते , जी पोखरत चालले तुझ्या जाणीवा ? समुद्र. नेहमी असतो तसाच उधाणलेला. तेव्हाही तो तसाच होता. आज तर तोही थोडा कलुषित झालाय! राहिला नाही तसाच नितळ. स्वच्छ. हं. समुद्राच्या काठावर वाळुचा किल्ला बांधण्याचा माझा चाललेला निष्फळ प्रयत्न पाहून तू उगाचच थोडासा नाराज...