मालकी हक्क
तू नको म्हणत असतानाही, मी तोच फोटो ठेवला माझ्या डीपीवर आत्ता.... कमेंट आले माझ्या प्रोपिकवर 'व्हेरी हॉट...!!!' बघ ना... अगदी मला बहिणीप्रमाणे मानणाऱ्या मला भावाप्रमाणे असणाऱ्या, मानलेल्या भावानेही तिचं कमेंट दिली. तुझ्या एखाद्याही पिक वर येत नसेल ना अशी कमेंट? कशी येईल! तुझ्या लिस्टमधल्या बायकांची नजर अजून तयार झाली नसेल, पुरुष नावाच्या वस्तूकडे पाहण्याची... किंवा झाली असेल तरी.... त्यांना अडवत असतील, त्यांच्या संस्कारांचे उंबरठे. बघ माझ्या मित्र यादीतले कित्येक मित्र, मला ओळखतही नाहीत, तरी मी त्यांच्यासाठी असते डीअर, हॉट आणि सेक्सी. ऐक ना, मलाही वाटतं, तुझ्याही प्रो-पिकला, कुणी तरी म्हणावं सेक्सी आणि हॅंडसम.... माझ्याशिवायही तू असावास कुणाचा तरी क्रश. म्हणजे बघ ना तू आवडणारा, मी एकटीच कशी असू शकेन? इतरही कुणी असेल जिला तू आवडत असशील..... म्हणजे माझ्या डीपीवर कसे बिनधास्त रिअॅक्ट होतात... तसच व्हावं कुणी, तुझ्याही डीपीवर रिअॅक्ट......